भिवंडी : नवविवाहितेला भरधाव टेंपोने चिरडले

भिवंडी : नवविवाहितेला भरधाव टेंपोने चिरडले

पतीसोबत दुचाकीवरून जात असताना २२ वर्षीय नवविवाहितेची अचानक धावत्या दुचाकीच्या टायरमध्ये ओढणी अडकल्याने ती रस्त्यावर पडली. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या टेंपोने तिला चिरडल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. ही घटना येवई-पिसे रोडवरील भावाळे गावानजीकच्या ऑलसेंट इंग्लिश स्कुलसमोर घडली आहे. कीर्ती देवेंद्र जाधव (२२, रा.चिंचवली) असे मृतक नवविवाहितेचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मृत किर्ती ही पती देवेंद्र याच्यासोबत चिंचवली येथून भावाच्या मुलाला कल्याण येथील एका रुग्णालयात पाहण्यासाठी जात होते. त्यावेळी पिसे रोडवरील भावाळे गावानजीक असलेल्या ऑलसेंट इंग्लिश स्कुल समोर धावत्या दुचाकीच्या चाकात तिची ओढणी अडकसी.ओढणी चाकात अडकल्याने ती दुचाकीवरून रस्त्यावर पडली असता त्याच सुमाराला पाठीमागून येणाऱ्या टेम्पो तिच्या अंगावरून जाऊन ती गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत भिवंडीतील सिराज हॉस्पटिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पडघा पोलिसांनी घटनस्थळी धाव घेवून पंचनामा करून किर्तीचा मृतदेह स्व.उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

First Published on: December 26, 2019 10:38 PM
Exit mobile version