निजामुद्दीन दिल्ली मरकजवरून परतलेल्या ९ पैकी २ कोरोना पॉझिटिव्ह

निजामुद्दीन दिल्ली मरकजवरून परतलेल्या ९ पैकी २ कोरोना पॉझिटिव्ह

देशाभरासह राज्यात हाहाकार माजविणारा कोरोना विषाणू पसरविण्यात दिल्ली निजामुद्दीन येथील मरकज मधील व्यक्ती कारणीभूत ठरत असतानाच भिवंडी शहरात शुक्रवारी आढळलेल्या ६ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये दिल्ली येथून २० मे रोजी परतलेल्या दोन व्यक्तींचा समावेश असून धक्कादायक म्हणजे या नऊ जणांना त्यांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट येण्याआधीच त्यांना क्वारंटाईन केंद्रातून घरी सोडून देण्यात आले होते.

दिल्ली निजामुद्दीन येथील मरकज जमातीचे कोरोना कनेक्शन उघड झाल्यानंतर सर्व देशभर हाहाकार उडाला. त्यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती मोठ्या संख्येने महाराष्ट्रात आल्या. त्यामुळे महाराष्ट्रासह मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्ण वाढू लागले. मध्यंतरी हे नाव बाजूला पडले असतानाच भिवंडी शहरात २० मे रोजी मरकज कार्यक्रमास दिल्ली येथे गेल्याने अडकून पडलेले नऊ जण भिवंडी शहरात दाखल झाले. यापैकी मिल्लत नगर येथील २० वर्षीय युवकाचे आजोबा यांनी तात्काळ या ९ जणांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले. त्या ठिकाणी त्यांचे स्वॅब नमुने घेतल्या नंतर त्याचा रिपोर्ट प्रलंबित असतानाच २३ मे रोजी या सर्व नऊ जणांना घरातच होम क्वारंटाईन करण्याचा सल्ला देत सोडून दिले. परंतु त्यानंतर २९ मे रोजी ९ पैकी २ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

धक्कादायक म्हणजे हे दोघे कोरोनाबाधित तब्बल सहा दिवस समाजात वावरत असल्याने कोरोनाच्या संसर्गाची भीती व्यक्त केली जात असून या सर्व प्रकारास महानगरपालिका आरोग्य विभागातील बेजबाबदार अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप कोरोनाबाधित युवकांच्या आजोबाने केला आहे. संपूर्ण इमारतीस वेठीस धरल्याने व कंटेंटमेंट झोनबाबत महानगरपालिका प्रशासन गांभीर्य बाळगत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली असल्याची प्रतिक्रिया स्थानिक हमीद शेख यांनी देत या संशयितांना एक नगरसेवकांच्या सांगण्यावरून क्वारंटाईन केंद्रातून सोडून दिल्याचा आरोप हमीद शेख यांनी केला आहे.

First Published on: May 30, 2020 8:09 PM
Exit mobile version