मनसेसोबत युती? छे छे, असं काही नाही – नवाब मलिक

मनसेसोबत युती? छे छे, असं काही नाही – नवाब मलिक

Congress NCP MNS

सध्या राज्यभर लोकसभा निवडणुकांचा ज्वर चढायला सुरुवात झाली असून सर्वच पक्ष स्वत:च्या ताकदीची चाचपणी करतानाच कोणत्या पक्षासोबत युती केल्यानंतर किती फटका? किंवा किती फायदा होईल? याचा अंदाज घेताना दिसत आहेत. पण सगळ्यांच्याच आकडेमोडीमध्ये राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अलगद समावेश झालेला आहे. कधी भाजपचे नेते राज ठाकरेंची भेट घेतात, तर कधी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मनसेच्या युतीच्या चर्चा झडतात. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाला तर सर्वच पक्षीयांनी हजेरी लावली होती. स्वत: उद्धव ठाकरेंनी सुद्धा उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे, या चर्चा अजूनच जोरात सुरू झाल्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या चर्चा निरर्थक असल्याचं सांगितलं जात आहे.

‘मनसेबाबबत कुठलीही चर्चा नाही’

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एक भाग म्हणून राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेणार का? या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अशा चर्चांना स्पष्ट शब्दांत नकार दिला. ‘आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. या आघाडीमध्ये राज ठाकरेंना घेण्याबाबत अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. काँग्रेस आणि आमच्यामध्ये सध्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. ४४ जागांबाबत निर्णय झाला आहे आता केवळ ४ जागांबाबत निर्णय होणे बाकी आहे’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.


कोण आहे काँग्रेसच्या यादीत? – २६ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची कुणाला उमेदवारी? यादी तयार!

‘प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत यावं’

दरम्यान, काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीतील समावेशाबद्दल आशावादी आहे. ‘रिपब्लिकन पक्षाच्या इतर गटांचाही आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकारांनाही आघाडीत सामावून घेण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी त्यांच्या ‘राजगृह’ या निवासस्थानी आमची काल चर्चाही झाली’, असं नवाब मलिक यावेळी म्हणाले.

First Published on: January 30, 2019 9:58 PM
Exit mobile version