मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत

मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होण्याच्या शक्यतेने निवडून आलेले आमदार धास्तावले आहेत. मात्र, मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. यावेळी आमदारांना धीर देताना शरद पवार म्हणाले की, मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत. त्यामुळे भीती बाळगू नका, आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांना भेटा, त्यांचे आभार माना.

या बैठकीत समान कार्यक्रम ठरविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावे आहेत. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे समन्वय समितीत आहेत.

यावेळी अजित पवार म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र बैठक होऊन चर्चा होणार आहे. आमच्या दोन पक्षात एकवाक्यता झाल्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करणार आहे. महत्त्वाच्या पदासंदर्भात चर्चा होईल आणि मार्ग काढला जाईल. तसेच या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत चर्चा करण्यासाठी ही समिती ठरविली गेली. महाराष्ट्रातील चर्चा लवकरात लवकर संपविण्याचा निर्णय घेणार आहे.

First Published on: November 14, 2019 5:30 AM
Exit mobile version