लसीबाबत कोणताही गैरसमज ठेऊ नका – किशोरी पेडणेकर

लसीबाबत कोणताही गैरसमज ठेऊ नका – किशोरी पेडणेकर

सीरम इन्स्टिट्युटकडून तयार करण्यात आलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरीत होऊ लागली असून मुंबईत देखील लसीचा पहिला हप्ता पोहोचला आहे. परळच्या एफ दक्षिण पालिका कार्यालयात हे लसीचे डोस ठेवण्यात आले आहेत. येत्या १६ तारखेला मुंबईतल्या विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून हे लसीकरण केलं जाणार आहे. यासंदर्भात मुंबई महानगर पालिकेने परळच्या पालिका कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या पूर्ण कामाची माहिती दिली. यावेळी, ‘पूर्ण तपासणी करूनच ही लस दिली जात आहे. त्यामुळे लोकांनी मनातून गैरसमज काढून टाका. लहान मुलांना देखील कधी लस दिली, तर त्याचे काही साईड इफेक्ट दिसतातच. त्यामुळे मुंबईकरांनी पुढे येऊन या लसीचं स्वागत करायला हवं’, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

‘मुंबईत १ लाख ३० हजार इतकी नोंदणी मुंबई महानगर पालिकेकडे झाली आहे. पहिल्या टप्प्यात ९ रुग्णालयातील लसीकरण केंद्रांना व्यवस्थित पद्धतीने लसीचे डोस पुरवण्यात आली आहे. मुंबईतली सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आधीपासूनच सक्षम आहे. मुंबई पालिका इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा पुरवणारी, स्वत:चे मेडिकल कॉलेज असणारी ही एकमेव पालिका आहे. सुरुवातीला लसीचा साठा परळ येथील स्टोरेजमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर कांजूरमार्ग येथे नेला जाईल. या मार्चमध्ये कोरोनाचा पराभव केल्याची गुढी उभारू, अशी आशा करूयात’, असं देखील महापौर यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, लसीकरण कशा पद्धतीने केलं जाणार, याविषयी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी माहिती दिली. ‘लस घेतल्यानंतर मास्क, सॅनिटायझरचा वापर करावाच लागेल. १२ पद्धतीची ओळखपत्रे लसीकरणाच्या वेळी लागणार आहेत. उदा. बँक पासबुक, आधारकार्ड, मतदान कार्ड इ. शिवाय लस दिल्यानंतर काही काळासाठी संबंधित व्यक्तीला देखरेखीखाली ठेवल जाईल. प्रत्येक शहराला एकाच कंपनीची लस देण्यात आली आहे. पहिला डोस कोव्हिशिल्डचा दिला तर दुसरा डोस देखील त्याच लसीचा दिला जाणार आहे. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये’, असं काकाणी म्हणाले.

First Published on: January 13, 2021 1:19 PM
Exit mobile version