परळ हिंदमातामध्ये पुढच्या वर्षी ‘नो वॉटर लॉगिंग’ – पालिका

परळ हिंदमातामध्ये पुढच्या वर्षी ‘नो वॉटर लॉगिंग’ – पालिका

मुंबईकरांसाठी पावसाचं साचणारं पाणी हा जणूकाही एक फेस्टिव्हलचाच भाग झाला आहे! पावसाळ्यात मुंबईत हमखास पाणी साचणारं ठिकाण म्हणजे परळ हिंदमाता. प्रत्येक पावसाळ्यात कमरेहून अधिक साचणाऱ्या पाण्यामुळे हे ठिकाण बदनाम झालं आहे. पण पुढच्या पावसाळ्यात या भागात पाणी साचणार नाही, असा दावा आता मुंबई महापालिकेने केला आहे. परळ हिंदमाता परिसरात पर्जन्य जलवाहिनी विस्तारीकरणाच्या कामामुळे पाण्याचा निचरा लवकर होईल, असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांना आहे. म्हणूनच पुढच्या वर्षी हिंदमाता येथे पाणी साचणार नाही, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

पर्जन्यवाहिन्यांचं विस्तारीकरण

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या पुढाकाराने परळ हिंदमाता परिसरात पर्जन्यवाहिन्या विस्तारीकरणाचे  पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यात आले आहे. तर पावसाळा संपल्यानंतर पुढील टप्प्याला सुरुवात केली जाईल. या कामाचा उपयोग हा पुढच्या पावसाळ्यात पाणी न साचण्यासाठी होईल. त्यामुळेच परळ हिंदमाता परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या कामामुळे गेल्या वर्षीच्या पावसाळ्याच्या तुलनेत पाण्याचा निचरा कमी होण्यासाठी मोठी मदत होत आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या कामामुळे सध्याच्या परळ टीटी, हिंदमाता परिसरात साचणाऱ्या पाण्याचं प्रमाण कमी होईल, असा विश्वास एफ साऊथ विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर देसाई यांनी व्यक्त केला आहे.

दुसऱ्या टप्प्यांतर्गत परळ पूर्वेच्या टेकडी भागातून येणाऱ्या पाण्याचा निचरा होणे शक्य होईल. तसेच हे पाणी काळाचौकी परिसरातून वरळीच्या ब्रिटानिया जंक्शनला पोहोचणे शक्य होईल. सध्या परळ टी टी जंक्शनला हे पाणी येतं. परळ टीटी जंक्शन आणि हिंदमाता परिसरातील पाणीसुद्धा ब्रिटानिका जंक्शनला वाहून जातं. पण हे पाणी वाहून जाताना तब्बल दोन तासांचा पल्ला पार पाडावा लागतो. परळ ते ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनचं ७ किलोमीटरचं अंतर आहे. हे पाणी पोहोचायला दोन तास लागतात.

परळ टीटी जंक्शनचा इतिहास

परळ हिंदमाता हा ७०० मीटरचा तलावसदृश्य असा पट्टा आहे. ट्रामला जुंपण्यात येणाऱ्या घोड्यांना याठिकाणी पाणी पाजण्यासाठी आणलं जायचं, असा याचा इतिहास आहे. हा सखल भाग असल्याने पूर्वेकडून टेकडी परिसरातून आलेलं पाणी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमा होतं. पाऊस जास्त असला की लगेच याठिकाणी पाणी जमा होतं. पण गेल्या पावसाच्या तुलनेत यंदाच्या पावसाळ्यात परळचा मडकेबुवा चौक भरला नाही. इतका पाऊस असूनही यंदा परळ टीटी जंक्शन पूर्णपणे जलमय झालेले नाही. अंडरग्राऊंडच्या पर्जन्यवाहिन्या विस्तारीकरणाच्या कामामुळेच पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत झाली आहे.

First Published on: July 9, 2018 8:07 PM
Exit mobile version