कोरोना काळात मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढ नाही- महापौर किशोरी पेडणेकर

कोरोना काळात मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढ नाही- महापौर किशोरी पेडणेकर

सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. सर्वांचीच अर्थिक स्थिती नाजूक आहे.कोरोना काळात मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढ लादणार नाही, असे स्पष्टीकरण महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.कोरोनामुळे लाखो, कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसाय, रोजगार बंद पडले आहेत. मुंबईकर आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच मुंबई महापालिकेने पुढील वर्षीपासून मालमत्ता करात १४ टक्के ते २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत अंदाजे एक हजार कोटींची वाढ होणार आहे.

या मालमत्ता कर वाढीला विरोधी पक्ष, भाजप यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. याबाबत महापौरांकडे विचारणा केली असता, मालमत्ता करवाढीबाबत पालिका प्रशासनाने जरी तसा निर्णय घेतला असला तरी सर्व लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घेणे गरजेचे आहे.कोरोनाने मुंबईकरांचे कंबरडे मोडले असतांना प्रशासनाने अशी कर वाढ करून त्यांना आणखी त्रास देऊ नये. कोरानाचे संकट अद्याप संपलेले नाही.आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे पाहत आहोत. मग अशा वेळेस मुंबईकरांच्या पाठिशी उभे राहायला हवे. मात्र करवाढ जर लागू केली असती तरी तुम्ही का केली? असा प्रश्न विचारला गेला असता. त्यामुळे अशी दुटप्पी भूमिका आमची नाही, असे महापौरांनी म्हटले आहे.

मनसेला दुसरे कामच नाही

नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार होत असून त्यामध्ये सत्ताधारी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे आहे, असा आरोप मनसेचे नेते व सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी केला आहे. मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांना याबाबत विचारणा केली असता, ‘मनसेला आरोप करण्याशिवाय दुसरे कामच नाही’, अशा शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नालेसफाईचा तो व्हिडिओ मला देखील आला असून तो मी अतिरिकत आयुक्त पी.वेलारासू यांना पाठविला आहे. ते त्या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहतील आणि त्यात तथ्य असेल तर संबधितांवर कारवाई करू, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.


राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, शिक्षकांना रेल्वे प्रवासी मुभा

First Published on: June 17, 2021 8:00 PM
Exit mobile version