स्वदेशी लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक मिळेनात!; निम्मा टप्पाही गाठता न आल्याने आरोग्य विभाग चिंतेत

स्वदेशी लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक मिळेनात!; निम्मा टप्पाही गाठता न आल्याने आरोग्य विभाग चिंतेत

प्रातिनिधीक फोटो

कोरोनाच्या लसीची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. राज्यात कोरोना लसीच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र मुंबईत सुरु असलेल्या स्वदेशी कोरोना लसीसाठी स्वयंसेवकच उपलब्ध होत नाहीत. लसीकरणासाठी अपुरी जनजागृती व लॉकडाऊनमुळे प्रवासाची अपुरी साधनांमुळे स्वयंसेवक उपलब्ध होत नसल्याने आरोग्य विभागासमोर नव्हे आव्हान निर्माण झाले आहे.

मुंबईतील जे. जे. रुग्णालय व पालिकेच्या सायन रुग्णालयात भारत बायोटेकद्वारा निर्मित ‘को-वॅक्सिन’ची चाचणी सुरु आहे. आयसीएमआरच्या निर्देशानुसार, सायन व जे.जे.रुग्णालयात ३१ डिसेंबरपर्यंत एक हजार स्वयंसेवक वॅक्सिनच्या चाचणीसाठी उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र ३१ डिसेंबरला काही दिवस उरले असताना स्वयंसेवकांचा निम्मा आकडाही गाठता आला नाही. दोन्ही रुग्णालयात अजूनही ६०० पेक्षाही अधिक स्वयंसेवकांची गरज आहे. जे.जे. रुग्णालयात ३९९ स्वयंसेवकांनी लसीची चाचणी करण्यासाठी नाव नोंदवले आहे. यातील ३६८ स्वयंसेवक लसीच्या परीक्षणात पात्र ठरले असल्याचे जे.जे. रुग्णालयाचे समन्वयक डॉ. दिनेश धोडी यांनी सागिंतले. तर सायन रुग्णालयात ६५० स्वयंसेवकांची आवश्यकता असल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सागिंतले. स्वयंसेवकांना पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने हे आव्हान कसे पूर्ण करायचे असा प्रश्न आरोग्य विभागासमोर निर्माण झाला आहे.

कोरोनाबाबत मागील अनेक महिन्यांपासून नागरिकांमध्ये असलेली भीती, संभ्रम आहे. तसेच रुग्णालयापर्यंत पोहचण्यास दळणवळणाची अपुरी साधने, लसी चाचणीच्या प्रक्रियेसाठी होणारा विलंब यामुळे स्वयंसेवक मिळत नाहीत. चाचणीबाबत जनजागृती करून लोकांपर्यंत पोहचण्याचे आमचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. यामुळे नक्कीच स्वयंसेवक मिळतील असा विश्वास जे.जे. रुग्णालयाचे समन्वयक डॉ. दिनेश धोडी यांनी व्यक्त केला.

First Published on: December 25, 2020 7:35 PM
Exit mobile version