मतदान कामाला गैरहजर शिक्षकांवर गुन्हा दाखल

मतदान कामाला गैरहजर शिक्षकांवर गुन्हा दाखल

Teacher

मतदार पडताळणीचे काम व बारावीची परीक्षा अशी तारेवरची कसरत सध्या शिक्षकांना करावी लागत आहे. त्यातच परीक्षेला प्राधान्य देत मतदानाच्या कामाला गैरहजर राहिलेल्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची नोटीस सहाय्यक मतदार नोंदणी अधिकार्‍यांकडून पाठवण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांसमोर आता नेमके कोणते काम करावे, असा प्रश्न पडला आहे.मुंबईतील सुमारे 500 हून अधिक शिक्षक सध्या मतदान कामासाठी केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त आहेत. त्यातच बारावीची परीक्षा सुरू झाल्याने परीक्षेसाठी नियंत्रक म्हणून शिक्षकांची कमतरता भासत आहे. ही बाब लक्षात घेऊन बारावीची परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी परीक्षेपूर्वीच मतदार पडताळणी कामावर नियुक्त काही शिक्षकांना कस्टोडियन म्हणून काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या प्रमुखांना आम्ही शिक्षक असून, आम्हाला परीक्षेच्या कामाला जाऊ द्यावे अशी विनंती व अर्ज केले.

अखेर शिक्षकांनी मंगळवारी शिक्षणाधिकार्‍यांच्या आदेशानुसार शाळेत जाऊन कस्टोडियन म्हणून काम पाहिले. ते काम संपण्यापूर्वीच गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकार्‍यांकडून शिक्षकांना नोटीस पाठवण्यात आली. या नोटीसमध्ये तुम्हाला पूर्णवेळ केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली असतानाही तुम्ही कोणासही न कळवता परीक्षेच्या कामाला गेलात असे नमूद केले आहे. याचबरोबर या शिक्षकांनी सायंकाळी 5.30 पर्यंत त्यांच्या कार्यालयत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. हजर झाला नाहीत तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशाराही पत्रात दिला. मात्र हे शिक्षक कस्टोडिनचे काम न संपल्यामुळे तेथे जाऊ शकले नाही. यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची वेळ आली आहे.

शिक्षणाधिकारी हा शिक्षकांचा प्रमुख असून, त्याचे आदेश मानणे त्यांना बंधनकारक आहे. संबंधित शिक्षकांनी त्यांच्या वरिष्ठांकडे विनंती अर्ज करूनही त्यांचा अर्ज न स्वीकारता त्यांना थेट आदेश काढण्यात आले आहेत. याबाबत तातडीने शिक्षणमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे.– शिवनाथ दराडे, कार्यवाह, शिक्षक परिषद

First Published on: February 20, 2020 5:45 AM
Exit mobile version