कोरोना लढ्यात आता नर्सिंग विद्यार्थ्यांची मदत!

कोरोना लढ्यात आता नर्सिंग विद्यार्थ्यांची मदत!

कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांची अपुरी संख्या यामुळे रुग्णांना सेवा पुरवण्यात अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आता नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनींना कोरोना लढ्यात सहभागी करून घेण्यात येणार आहे.

कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईमध्ये चार ठिकाणी जम्बो सुविधा केंद्र सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नेहरू तारांगण, रेसकोर्स, बीकेसी-एमएमआरडीए आणि नेस्को याठिकाणी केंद्र उभारण्यात येत आहेत. या जम्बो सुविधा केंद्रांवर डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता लागणार आहे. त्यानुसार मुंबईतील विविध सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना कोरोना ड्युटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत या विद्यार्थिनींना हॉस्टेलमध्येच ठेवण्यात आले होते. परंतु मनुष्यबळाची गरज लक्षात घेता आता प्रशासनाने नर्सिंगच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थींची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार या विद्यार्थिनींना तातडीने प्रशिक्षण देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. या विद्यार्थिनींना कोरोना ड्युटी ही बंधनकारक करण्यात आली आहे. जम्बो सुविधा केंद्रावर नर्सिंगच्या विद्यार्थींनीची सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी डॉ. तात्याराव लहाने, कोरोना नियंत्रक कक्षाचे समन्वयक डॉ. स्वामिनाथन आणि पालिकेचे उपायुक्त यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

First Published on: May 20, 2020 6:21 PM
Exit mobile version