मुख्यमंत्री आणि आदित्यच्या यात्रेला राष्ट्रवादीकडून ‘शिवस्वराज्य यात्रे’चे उत्तर

मुख्यमंत्री आणि आदित्यच्या यात्रेला राष्ट्रवादीकडून ‘शिवस्वराज्य यात्रे’चे उत्तर

डॉ. अमोल कोल्हे आणि राजे खासदार उदयनराजे भोसले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रे’ला आणि आदित्य ठाकरेंच्या ‘जनआशीर्वाद यात्रे’ला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढणार आहे. रिल लाईफमधील संभाजी महाराज अशी छवी असलेले शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि रिअल लाईफमधील राजे खासदार उदयनराजे भोसले या यात्रेचे चेहरे असणार आहेत. तर काही निवडक ठिकाणी अजित पवार देखील यात्रेत सहभागी होणार आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत या यात्रेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

६ ऑगस्ट पासून यात्रेला सुरूवात

शिवस्वराज्य यात्रेची सुरवात छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून सुरू होणार आहे. ही यात्रा रोज ३ विधानसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करणार आहे. ६ ऑगस्ट पासून यात्रेला सुरूवात होणार आहे. पहिला टप्पा जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा येथे संपेल. तर १६ ऑगस्ट रोजी या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा तुळजापूर येथून सुरू होईल आणि या यात्रेची सांगता रायगडावर होणार आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे यात्रेची धुरा

यात्रेचे संपुर्ण नियोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसवर असणार आहे. राष्ट्रवादीमधून सध्या आऊटगोईंग जोरात सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचा चेहरा म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे यात्रेची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याचवेळी उदयनराजे भोसले हे देखील या शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत.

First Published on: July 31, 2019 4:00 PM
Exit mobile version