CoronaEffect: आता रेल्वे परिसरातून घ्या भाजीपाला

CoronaEffect: आता रेल्वे परिसरातून घ्या भाजीपाला

भाजी मार्केट (प्रातिनिधीक फोटो)

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तू जवळच्याजवळ उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. आता मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या परिसरात नागरिकांना हिरव्या भाज्या आणि फळे विकत घेता येणार आहेत. त्याची सुरूवात मध्य रेल्वेच्या मुंबई रेल्वे स्थानकातून झाली आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानकाजवळ राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

देशभरात करोनाचा संसर्ग वाढल्याने सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. संसर्ग वाढू नये म्हणून देश तब्बल २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बाजारपेठांऐवजी नागरिकांच्या परिसरात कशाप्रकारे जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देता येतील, याकरता युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मध्य रेल्वेने हिरव्या भाज्या आणि फळे विक्रीसाठी मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या परिसरातील जागा दिली आहे. विक्रेत्यांना ही जागा वापरण्यास परवानगी मिळाली आहे. या संदर्भात, महाराष्ट्र शासनाने रेल्वे प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. यास मध्य रेल्वे प्रशासनाने तत्काळ मान्यता दिली. स्थानकावर गर्दी होणार नाही, प्रत्येक विक्रेता आणि ग्राहक यामध्ये ठराविक अंतर राखला जाणार आहे. यासह सुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा – याला म्हणतात सामाजिक बांधिलकी; कोरोनाशी लढण्यासाठी टाटा कडून १५०० कोटींची मदत

मध्य रेल्वेच्या ४७६ स्थानकांवर मिळू शकते सुविधा

मध्य रेल्वेचे जाळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. ज्यात लहान-मोठे ४७६ रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मिळून एकूण १०० पेक्षा जास्त उपनगरीय रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. सध्या देशभरात करोनामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्या यासाठी मध्य रेल्वे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शासनाने मागणी केल्यास आम्ही रेल्वे स्थानकातील परिसर जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करू, तसेच ती आमची प्राथमिकता आहे, अशी भावना मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

First Published on: March 28, 2020 9:00 PM
Exit mobile version