राज ठाकरे आता ‘हिंदूजननायक’, मनसे कार्यकर्त्यांचा असा असेल ड्रेसकोड

राज ठाकरे आता ‘हिंदूजननायक’, मनसे कार्यकर्त्यांचा असा असेल ड्रेसकोड

राज ठाकरे हिंदू जननायक असल्याचा उल्लेख टी शर्टवर आहे

भारतात बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना हुसकावून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत ९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. नवीन झेंडा आणि नवीन अजेंड्यानंतर आता मनसेने नवीन टी शर्ट सुद्धा समोर आणले आहे. मोर्चाच्या दिवशी मनसैनिक हे टी शर्ट घालून मोर्चात सामील होतील, अशी माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी या जयंतीदिनी मनसेने महाअधिवेशन घेऊन हिंदुत्त्वाचा पुरस्कार केला. त्यानंतर मनसैनिकांनी राज ठाकरे हिंदूहृदयसम्राट असल्याचे फलक लावले होते. मात्र स्वतः राज ठाकरेंनी मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका, असे ठणकावून सांगितले. आता मोर्चाच्या निमित्ताने जे टी शर्ट छापण्यात आले आहेत. त्यावर राज ठाकरेंना हिंदूजननायक ही नवी उपाधी लावण्यात आली आहे. 

मनसेने २००८ साली रझा अकादमीच्या विरोधात मोठा मोर्चा काढला होता. त्यांनतर आता पुन्हा एक मोठा मोर्चा निघणार आहे. गिरगाव चौपाटी, हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग ठरला असल्याचे सांगितले जात आहे. स्वतः राज ठकरे यात सामील होणार आहेत. या मोर्च्याच्या प्रचारासाठी सोशल मीडिया, वॉर्डमध्ये सभा, राज्यभर छोट्या सभा घेतल्या जात आहेत. सर्वांना मोर्च्यात सामील होण्याचे आव्हान केलं जात आहे. मुंबईत सुद्धा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तयारी करत आहेत. कुलाबा विधानसभेत हा मोर्चा असल्याने येथील मनसैनिक मोठी तयारी करत आहेत.

गिरगावातील निशांत गायकवाड यांनी मोर्च्यासाठी खास टी शर्ट छापून घेतले आहेत. “प्रश्न राष्ट्रसुरक्षतेचा म्हणून तर एल्गार हिंदूजननायकाचा” असे वाक्य या टी शर्टवर छापण्यात आले आहे.

तर दुसरीकडे दादर मध्ये सुद्धा मोर्चाचा प्रचार केला जात आहे. मनसे पक्षाचे फिरते वाहन सर्व विभागात फिरून मोर्चात सामील होण्याचे सामान्यांना आवाहन करत आहे. नेमका मोर्चा का काढला जात आहे? हे सांगितले जात आहे. या मोर्च्यात फक्त मनसैनिक सामील होणार नसून इतर संघटना, नागरिकसुद्धा सामील होणार आहेत, अशी माहिती विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी दिली.

First Published on: February 6, 2020 8:55 PM
Exit mobile version