आता लॉकडाऊनची जबाबदारी त्या त्या राज्यावर देण्याची शक्यता!

आता लॉकडाऊनची जबाबदारी त्या त्या राज्यावर देण्याची शक्यता!

देशासह राज्यातील चौथा लॉकडाऊन येत्या ३१ मे रोजी संपत आहे. पुन्हा १५ जूनपर्यंत केंद्र सरकार लॉकडाऊन वाढवण्याच्या विचारात असून, ३१ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन ५ ची घोषणा करतील. मात्र, यावेळी लॉकडाऊनची सर्व जबाबदारी ही त्या त्या राज्यावर देण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार मिळून लॉकडाऊन ४ चे परिक्षण करत आहेत. गृह मंत्रालय देखील राज्य सरकारांसोबत ताळमेळ राखत यावर लक्ष ठेवून आहे. सर्व राज्यांकडून लॉकडाऊन ४ संदर्भातील अहवाल मागितला जाणार आहे. या अहवालानंतर केंद्र सरकार कोणत्या राज्यात लॉकडाऊन वाढवायचा याचा निर्णय घेणार आहे.  दरम्यान राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावेळच्या लॉकडाऊनची जबाबदारी ही त्या त्या राज्यावर दिली जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

देशातील चौथा लॉकडाऊन संपण्यासाठी दोन दिवस उरले आहेत. शिवाय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्याबाबत अजित पवार म्हणाले की, लॉकडाऊनबद्दल भारत सरकार काय निर्णय घेतंय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतीलच, पण माझ्या अंदाजाने वेगवेगळ्या राज्यांवर ते जबाबदारी देण्याची शक्यता असल्याचे अजित पवार म्हणालेत. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन त्यांच्या पातळीवर कोरोना रोखण्याचे प्रयत्न करत आहे. शहरी भागातून स्थलांतर झाल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र खबरदारी घेतली तर घाबरण्याचे कारण नाही असेही अजित पवार यावेळी म्हणालेत.

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लॉकडाऊन ५ ची जबाबदारी ही त्या त्या राज्याकडे देण्यात येणार असल्याने केंद्राकडून मिळणारी मदत देखील मिळणार नसल्याची माहिती मिळत असून, लॉकडाऊन ४ पर्यंत केंद्र सरकार सर्व राज्यांना मदत करत होते. आता लॉकडाऊन ५ हे ज्या राज्यात कोरोना रुग्ण सर्वाधिक आहेत त्या राज्यातच घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र सगळ्यात पुढे असून, महाराष्ट्राची वाढती आकडेवारी ही देशाची आणि राज्याची डोकेदुखी ठरली आहे.

First Published on: May 29, 2020 7:06 PM
Exit mobile version