आता रेल्वे सुंदरींच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक

आता रेल्वे सुंदरींच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक

भारतीय रेल्वेत पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस नवी दिल्ली ते लखनऊ दरम्यान सुरू झाली. त्या पाठोपाठ आता 10 नोव्हेंबर रोजी दुसरी तेजस एक्स्प्रेस मुंबई ते अहमदाबाद मार्गावर सुरू होणार आहे, यात प्रवाशांच्या आणि एक्स्प्रेस गाडीत त्यांच्या सेवेकरता ‘रेल हॉस्टेस’ नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यांना प्रवाशांकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी रेल हॉस्टेस यांच्याकडून केल्या जात आहेत. त्यामुळे आता या रेल हॉस्टेसच्या सुरक्षेकरता तेजस एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे.

देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस एक्स्प्रेस 4 ऑक्टोबर 2019 पासून लखनऊ ते दिल्ली अशी सुरू झाली आहे. ही ट्रेन सुरू होऊन 21 दिवस उलटले आहेत. मात्र अल्पावधीतच ही खासगी ट्रेन सर्वांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या ट्रेनमध्ये विमानासारख्या अत्याधुनिक सुविधा आयआरसीटीसीकडून देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे ज्याप्रमाणे विमानात प्रवाशांच्या सेवेसाठी हवाई सुंदरी तैनात असतात त्याच धर्तीवर आता या खासगी रेल्वे गाड्यांमध्ये ‘रेल हॉस्टेस’प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. मात्र या नेमण्यात आलेल्या ‘रेल होस्टेस’बद्दल प्रवाशांमध्ये कुतूहल आणि आकर्षण आहे. त्या प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरवण्यासोबतच इतर मदतही करतात आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतात. मात्र जेव्हापासून खासगी तेजस एक्स्प्रेस सुरू झाली, तेव्हापासून या काळ्या-पिवळ्या युनिफॉर्ममधल्या रेल हॉस्टेसना वेगळ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या गाडीतून प्रवास करणारे लोक अनेकदा त्यांच्यासोबत सेल्फीची मागणी करतात.

कधी कधी तर त्यांना न विचारता त्यांचे फोटो वा व्हिडिओ काढत असल्याच्या तक्रारी रेल हॉस्टेसकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा ऐरणीवर आला आहे. यावर आळा घालण्यासाठी आयआरसीटीसीकडून उपाययोजना करण्यात येणार आहे. यासंबंधी अधिकार्‍यांकडून सुचनाही मागण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि तेजसमध्ये काम करणार्‍या रेल हॉस्टेससाठी सुरक्षा रक्षक नेमण्याचीही सूचना आली आहे. सोबतच सूचना फलक आणि वारंवार बर्जर बॅट दाबून ‘रेल हॉस्टेस’ यांना त्रास देणार्‍या प्रवाशांसाठी काही नियमावली तयार करण्याच्या सुचनाही अधिकार्‍यांनी दिल्या आहेत. यावर आयआरसीटीसी विचार करत आहेत.

10 नोव्हेंबर 2019 रोजी आयआरसीटीसीची दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुरू होणार आहे. या दुसर्‍या खासगी रेल्वेत कोणत्याही अडचणी येऊ नये, म्हणून सर्व उपाययोजना करण्यात येणार आहे. पहिली तेजस एक्स्प्रेस लखनऊ ते दिल्ली दरम्यान सुरू झाली होती. त्यामध्ये प्रवाशांकडून रेल्वे हॉस्टेस यांना त्रास दिला जात होता. त्यामुळे दुसर्‍या खासगी तेजस एक्स्प्रेसमध्ये रेल हॉस्टेस यांच्याकरता सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. याविषयी आयआरसीटीसीच्या अधिकार्‍यांची बैठक झाली असून लवकरच खासगी तेजसमध्ये सुरक्षा रक्षक दिसणार आहेत.

First Published on: October 26, 2019 5:58 AM
Exit mobile version