Mumbai Corona Update: दादर, माहीम,धारावीमधील कोरोना रुग्णांची संख्या २६ वर घसरली

Mumbai Corona Update: दादर, माहीम,धारावीमधील कोरोना रुग्णांची संख्या २६ वर घसरली

मुंबईत सध्या कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव आता आटोक्यात येऊ लागला आहे. त्यामुळेच दादर, धारावी आणि माहीम या विभागात दररोज आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५६ वरून थेट २६ वर घसरली आहे. पालिका आरोग्य यंत्रणा, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच या तीन विभागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट होऊ लागली आहे. त्यामुळे एकप्रकारे दादर, माहीम व धारावी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

२३ मे रोजी धारावी विभागात कोरोनाग्रस्तांची संख्या १६ , दादर विभागात २२ तर धारावी विभागात १८ अशी एकूण ५६ एवढी होती. मात्र आज २५ मे रोजी धारावी विभागात कोरोनाग्रस्तांची संख्या ७ , दादर विभागात १५ तर माहीम विभागात १४ अशी एकूण ३६ वर ही संख्या घसरली आहे. आतापर्यंत धारावीत कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ७९५, दादर विभागात ९ हजार ३७० तर माहीम विभागात ९ हजार ६५५ अशी एकूण २५ हजार ८२० एवढी नोंदविण्यात आली आहे.

संपूर्ण विचार केला असता मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईचा रिकव्हरी रेट आज ९३ टक्क्यांवरुन ९४ टक्के झाला आहे. मुंबईत नेहमीप्रमाणे बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.  मुंबईत आज १ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ५५ हजार ४२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत  गेल्या २४ तासात ३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: चिंताजनक! राज्यात २४ तासांत ६०१ जण मृत्युमुखी; एकूण मृत्यूची संख्या ९० हजार पार

First Published on: May 25, 2021 9:26 PM
Exit mobile version