महानगरपालिकेच्या रुग्णालयांवर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

महानगरपालिकेच्या रुग्णालयांवर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

महापालिका रुग्णांलयांकडून केली जाणारी लपवाछपवी आणि खाटांचा अभाव तसेच वैद्यकीय सुविधांबाबत होणाऱ्या गैरसोयींच्या तक्रारी समोर येवू लागल्याने अखेर राज्याच्या मुख्य सचिवांनी मुंबईतील महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्ती केली आहे. महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर या तिन्ही रुग्णालयांवर अनुक्रमे अजित पाटील, बालाजी मंजुळे आणि मदन नागरगोजे यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेने या तीन प्रमुख रुग्णालयांच्या व्यवस्थापनापूर्वी सहायक आयुक्तांवर जबाबदारी सोपवली होती. परंतु विभागातील कोरोनाचा आजार नियंत्रण आणताना या रुग्णालयांच्या विशेष कार्य अधिकारी असलेल्या सहायक आयुक्तांना रुग्णालयांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही.

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येणारी महापालिकेची केंद्र तसेच रुग्णालय आदी ठिकाणी मोठ्याप्रमाणात रुग्णांची गैरसोय होत आहे. संपूर्ण मुंबईचा सर्वाधिक भार पेलणाऱ्या केईएम, शीव आणि नायर या तीन प्रमुख रुग्णालयांमध्येही कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांवर योग्यप्रकारे उपचार राबवले जात आहे. याठिकाणी ओपीडीमधून रुग्णांना माघारी परतवले जात आहे. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी रुग्णालयाची वैद्यकीय सेवा कोलमडून पडलेली आहे.

महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये होणारी रुग्णांची गैरसोय लक्षात घेता राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मुंबई महानगरपालिकेच्या ३ प्रमुख सर्वोपचार रुग्णालयांच्या अधिक प्रभावी देखरेख व व्यवस्थापनासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस) तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच केली आहे. या अनुषंगाने संबंधित आदेशानुसार मुंबई सेंट्रल येथील  नायर रुग्णालयासाठी मदन नागरगोजे यांची नियुक्ती केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत तर ते सध्या राज्य शासनात उपसचिव या पदावर कार्यरत आहेत.

तर परळमधील के.ई.एम. रुग्णालयासाठी अजित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष २००७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. ते सध्या महा-आयटी महामंडळाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय शीव परिसरातील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयासाठी बालाजी मंजूळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष २००९ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. ते सध्या राज्य शासनाच्या नियोजन विभागात उपसचिव पदावर कार्यरत आहेत.

या सर्व नवनियुक्त अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक गुरुवारी दुपारी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान महापालिका आयुक्त चहल यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांना ‘कोविड कोरोना १९’ च्या अनुषंगाने महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये असलेल्या सेवा सुविधा आणि मनुष्यबळ याविषयी थोडक्यात व महत्त्वाची माहिती दिली. तसेच महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या अधिक प्रभावी व्यवस्थापनासाठी सोपविलेल्या जबाबदारी विषयी त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांबद्दलही सांगितले.

जीटी आणि जे.जे. रुग्णालयांची जबाबदारी सुशील खोडवेकर यांच्यावर

मुंबईतील जी. टी. रुग्णालय आणि जे. जे. रुग्णालय, या राज्य शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालयांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष २०११ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. खोडवेकर हे देखील महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात गुरुवारच्या आयोजित बैठकीला उपस्थित होते. या अधिकाऱ्यांना त्यांचे राज्य शासनातील काम सांभाळून रुग्णालयांच्या व्यवस्थापनाचे काम तात्पुरत्या स्वरूपात बघावयाचे आहे, असेही संबंधित आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेत १४ सनदी अधिकारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत कोरोना नियंत्रण कक्षाचे समन्वयक तसेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून प्रथम मनिषा म्हैसकर, डॉ. रामास्वामी, प्राजक्ता लवंगारे, सुजाता सौनिक व अन्य एक अशाप्रकारे हे पाच सनदी अधिकारी यापूर्वीच कोरोनाच्या उपायोजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत आहेत. त्यातच आता आणखी मदन नागरगोजे, अजित पाटील व  बालाजी मंजुळे या तीन सनदी अधिकाऱ्यांची भर पडली आहे. याशिवाय महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह अश्विनी भिडे, पी.वेलरासू, संजीव जयस्वाल, सुरेश काकाणी आदी चार अतिरिक्त आयुक्त व सहआयुक्त आशुतोष सलिल अशाप्रकारे सहा सनदी पूर्वीपासूनच महापालिकेत कार्यरत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सनदी अधिकाऱ्यांची संख्या १४ वर पोहोचली आहे.

First Published on: May 21, 2020 9:31 PM
Exit mobile version