शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र विधिमंडळात

शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र विधिमंडळात

शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधिमंडळात लावण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्याकडे मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे. सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या ५७ दिवसांत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही मंजुरी मिळवली आहे.

शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी विशेषत: हिंदुत्वाशी फारकत घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी उठाव केला आणि पक्षातच वेगळा गट केला. त्यांना अन्य १० आमदारांनी साथ दिली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. त्यानंतर ३० जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी एका पाठोपाठ एक निर्णयांचा धडाकाच लावला.

उद्धव ठाकरे यांनी जवळपास ३१ महिने मुख्यमंत्रीपद भूषविले. वर्षाचे ३६५ दिवस असतात. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९४०-९४५ दिवस मुख्यमंत्रीपद भूषविले, पण ते विधिमंडळात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेऊ शकले नाहीत, मात्र बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आपल्याकडे असल्याचा दावा करणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या ५७ दिवसांत विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतला. त्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिरवा कंदीलही दाखवला आहे.

संसदेतही चित्रासाठी प्रयत्न
महाराष्ट्र सदनात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात आला पाहिजे. तसेच नव्या संसदेच्या इमारतीतही बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावले पाहिजे, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटातील सर्व खासदारांनी केली आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार आहेत.

First Published on: August 26, 2022 3:08 AM
Exit mobile version