Metro 3 : चर्चगेट ते हुतात्मा चौक मेट्रो स्थानकादरम्यान बोगदा तयार

Metro 3 : चर्चगेट ते हुतात्मा चौक मेट्रो स्थानकादरम्यान बोगदा तयार

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या चर्चगेट ते हुतात्मा चौक येथील मेट्रो स्थानकादरम्यान असलेला बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. मेट्रो ३ च्या मार्गातील हे ३३ वे भुयारीकरण आहे. मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ८८% भुयारीकरण व ६०% बांधकाम पूर्ण झाले आहे.

चर्चगेट ते हुतात्मा चौक स्थानकांतील अंतर ६५३ मीटरचे आहे. भुयारीकरणादरम्यान एकूण ५०२ रिंग्जचा वापर केला गेला. अवघ्या २७५ दिवसात डाऊन लाईन मार्गाचे भुयारीकरण एनएटीएम  (NATM) बोगद्यात पूर्ण करण्यात आले. एनएटीएम  (NATM) बोगद्यात पूर्ण होणारे हे मेट्रो-३चे पहिलेच भुयारीकरण आहे. सूर्या – २ या रॉबिन्स बनावटीच्या ड्युएल-मोड हार्ड-रोक टनेल बोअरिंग मशीनद्वारे हा बोगदा खणण्यात आला.

दक्षिण मुंबई परिसरातील फ्लोरा फाऊंटनसह अन्य ऐतिहासिक इमारतीखालून भुयारीकरण करणे एक आव्हानात्मक काम होते. यासाठी कट ॲन्ड कव्हर आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग या दोन्ही पद्धतीचा संयुक्तिक वापर करून हे अभियांत्रिकी आव्हान पूर्ण करण्यात आले. चर्चगेट आणि हुतात्मा चौक स्थानकादरम्यान असलेली व्यापारी केंद्र याद्वारे जोडली जातील, अशी माहिती एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली.

पॅकेज-१ अंतर्गत  कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. आतापर्यंत हुतात्मा चौक स्थानकाचे एकूण ५३ % काम पूर्ण झाले आहे. पॅकेज – १ मध्ये एकूण ८०% भुयारीकरण आणि ६८ % बांधकाम पूर्ण झालेले आहे.


 

First Published on: October 16, 2020 7:19 PM
Exit mobile version