श्रमजीवींचा 30 ऑक्टोबरला विराट मोर्चा

श्रमजीवींचा 30 ऑक्टोबरला विराट मोर्चा

Tribal

वसई :-आपल्या न्याय्य हक्कांसाठी सरपण आणि चुली घेवून आदिवासी ग्रामस्थ सज्ज झाले असून,30 ऑक्टोबरपासून मागण्या मान्य होईपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातच आपला संसार थाटण्याचा निर्धार श्रमजीवी संघटनेने केला आहे.
आश्वासने देवूनही आदिवासींच्या तोंडाला पाने पुसणार्‍या मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी 30 ऑक्टोबरला श्रमजीवी संघटनेद्वारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. गावोगावी, पाडे, वस्त्यांमध्ये रात्रीच्यावेळी सभा घेण्यात आल्या आहेत.पोस्टर्स छापून जनजागृती करण्यात आली आहे.

लोकवर्गणी गोळा करून ठाण्याला जाण्यासाठी गाड्या ठरवण्यात आल्या आहेत.तारपे,संबळ,ढोल,ढोलक्या साफ करण्यात आल्या आहेत. मनोरंजनासाठी पारंपारिक नाचही तयार आहेत. आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काचे सातबारा द्या,प्रचलित पद्धतीने रेशन द्या,घराखालील जागा त्यांच्या नावे करून द्या,जिल्ह्यातील रिक्त पदे भरा अशा मागण्यांसह आरोग्य केंद्र,आश्रम शाळांची दुरावस्था,डॉक्टर्सची कमतरता,रोजगार हमी योजनेतील त्रुटी,जव्हारला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करणे,रोहयो आणि रेशनिंग यंत्रणा जव्हारला राबवणे,पोषण आहारातील अनियमीतता दुर करणे, टीएचआरचा ठेका रद्द करून गावातील ताजे आहार मुलांना पुरवणे,पालघर जिल्ह्यातील कुपोषण आदि मुद्ये विवेक पंडीत यांनी वारंवार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलनेही करण्यात आली होती.त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासने दिली होती.मात्र,या आश्वासनांची पुर्तता झाली नाही.त्यामुळे या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्यासाठी गेल्या आठवड्यांपासून मुंबई,ठाणे,पालघर,रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवांसी पाड्यांमध्ये तयारी सुरु आहे.या मागण्या पुर्ण करेपर्यंत मोर्चेकरी ठाण्यात ठाण मांडून बसणार आहेत.त्यामुळे मोर्च्याला येताना प्रत्येक आदिवासीं नागरिक जेवणाचे सामान,चुल आणि सरपण घेवून येणार आहेत.या मोर्च्यात 50 हजारांहून जास्त आदिवासी सहभागी होणार आहेत.अशी माहिती श्रमजीवीचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी दिली.

First Published on: October 29, 2018 12:04 AM
Exit mobile version