खालापुरात दीड किलो सोने जप्त

खालापुरात दीड किलो सोने जप्त

Khalapur Police

अवैधपणे सोन्याची तस्करी करणार्‍या पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाला खालापूर पोलिसांनी सापळा रचून खाजगी बसमधून ताब्यात घेतले असून, सुमारे चव्वेचाळीस लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. गोवा-मुंबई व्हाया कोल्हापूरला सोने नेण्यात येत होते. खालापूर पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना खबर्‍याने दिलेल्या गुप्त माहितीनुसार खाजगी प्रवासी बसमधून सोन्याची तस्करी होत असून, सदरची बस मुंबईहून कोल्हापूरला जाणार आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, सपोनी महेंद्र शेलार, पोलीस नाईक नितिन शेडगे, हेमंत कोकाटे, रणजित खराडे, पोलीस शिपाई समीर पवार, महिला पोलीस भारती नाईक मुंबई पूणे द्रूतगती मार्गावर खालापूर टोल नाका येथे दबा धरून बसले होते. प्रत्येक खाजगी बसची कसून तपासणी सुरू होती.

शनिवारी पहाटे साडे सहाच्या सुमारास कोल्हापूरला जाणारी खासगी बसची तपासणी करताना एका वृद्धाची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याच्या सामानाची कसून झडती घेतली असता कपड्यात लपविलेले सोन्याचे दागिने आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता वृद्धाने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला अधिक चौकशीकरिता खालापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. जवळपास 1 किलो 471 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने वृद्धाजवळ सापडले असून, बाजारभावाप्रमाणे 44 लाख किंमत आहे. याबाबत पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट तपासणी मोहीम सुरू असून, सोने तस्करीची मला खबर्‍यामार्फत माहिती मिळताच आम्ही खालापूर टोल नाका येथे सापळा रचला होता. तस्करी करणारी व्यक्ती 75 वर्षीय असून, कुडाळ, सिंधुदुर्ग येथील आहे. या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून अधिक तपासासाठी नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
-विश्वजित काईंगडे
पोलीस निरीक्षक खालापूर

First Published on: March 25, 2019 4:13 AM
Exit mobile version