विरारमध्ये दरोडेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

विरारमध्ये दरोडेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

विरारमधील एक मोबाईल दुकान लुटण्यासाठी आलेल्या दोन दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात दुकानात मालक जागीच ठार झाला. तर त्याचा मेव्हणा गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.
विरारपासून जवळच कुंभारपाड्यातील रिद्धी सिद्धी मोबाईल दुकान बंद करण्याची वेळ झाली असतानाच तोंडाला रुमाल बांधलेले मोटार सायकलवरून आलेले दोन दरोडेखोर दुकानात घुसले. त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने दुकानाचे शटर बंद करून गावठी कट्टयाचा धाक दाखवून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. दुकानात असलेल्या मालक विशाल गुप्ता आणि त्यांचा मेव्हणा विजयकुमार गुप्ता यांनी दरोडेखोरांना विरोध केला. त्यावेळी झटापट झाली असता दरोडेखोरांनी दोघांवर गोळीबार केला. यात छाती आणि पोटात दोन गोळ्या लागल्याने दुकानमालक विशाल गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला. तर विजयकुमार गुप्ता गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील लोक जमा झाले. जमाव पाहून दरोडेखोर पळून जाऊ लागले. त्यावेळी एक दरोडेखोर लोकांच्या हाती लागला. तर दुसरा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पकडलेल्या दरोडेखोराला संतापलेल्या जमावाने चांगलाच चोप दिला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी दरोडेखोराला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलिसांना तीन गोळ्या, एक गावठी पिस्तुल सापडले आहे. फरार दरोडेखोराच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.

First Published on: December 17, 2019 2:58 AM
Exit mobile version