सीईटी परीक्षेवर आता महाऑनलाईनचे नियंत्रण

सीईटी परीक्षेवर आता महाऑनलाईनचे नियंत्रण

प्रातिनिधिक फोटो

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) मेडिकल, लॉ, आर्किटेक्चर या विषयांच्या यशस्वी सीईटी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. परंतु 2 ते 13 मेदरम्यान होणार्‍या एमएचटी-सीईटीच्या परीक्षेवर आता महा ऑनलाईनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. सीईटी कक्षाकडून घेण्यात येणारी ही सर्वात मोठी परीक्षा आहे. या परीक्षेला राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यामुळे परीक्षेदरम्यान कोणताही गोंधळ झाल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळवून कार्यवाही करणे शक्य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सीईटीकडून सांगण्यात आले.

सीईटी सेलकडून 2 ते 13 मेदरम्यान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयाची घेण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेला तब्बल 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून 3 लाख 96 हजार 624 जणांनी अर्ज भरले आहेत, तर अन्य राज्यातून 16 हजार 660 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये मध्यप्रदेश (3332), उत्तर प्रदेश (2429) आणि बिहारमधून (1962) सर्वाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा ऑनलाईन देण्यात कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी सीईटी सेलकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑफी’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सराव परीक्षा घेण्यात येत आहेत. एमएचटी सीईटी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या परीक्षेदरम्यान कोणतीही गडबड व गोंधळ होऊ नये यासाठी सीईटी सेलकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व नियंत्रण कक्षांना महा ऑनलाईनद्वारे जोडण्यात येणार आहे. यासाठी मुख्य सचिवांच्या कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील कोणत्याही केंद्रावर परीक्षेदरम्यान गोंधळ झाल्यास त्याची माहिती प्रथम जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षाला व तेथून तातडीने महा ऑनलाईन कक्षाला कळवण्यात येणार आहे. महाऑनलाईन नियंत्रण कक्ष मुख्य सचिवांच्या कार्यालयात असल्याने कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यावर मुख्य सचिवांकडून तातडीने तोडगा सूचवण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान झालेला गोंधळ सोडवणे काही क्षणात शक्य होणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

एमएचटी सीईटीच्या परीक्षेला राज्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बसतात. त्यामुळे परीक्षेवेळी एखादा गोंधळ होऊन त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाऑनलाईनद्वारे सचिवांकडून तातडीने निर्णय घेऊन समस्या सोडवणे शक्य होणार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे.
– आनंद रायते, आयुक्त, सीईटी सेल

First Published on: April 23, 2019 4:59 AM
Exit mobile version