खाते बंद होण्याचा एसएमएस पाठवून सेवानिवृत्ताची ऑनलाईन फसवणूक

खाते बंद होण्याचा एसएमएस पाठवून सेवानिवृत्ताची ऑनलाईन फसवणूक

जन्मतारीख चुकीची असल्याने आपले बँक खाते बंद होऊ शकते, असा एसएमएस मोबाईलवर पाठवून एका भामट्याने ठाण्यातील सेवानिवृत्ताच्या खात्यातून लाखो रुपये वळते केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नितीन विरकर (५८) रा. पाचपाखाडी, धर्मवीर मार्ग असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून भामट्याने त्यांच्या खात्यातून ऑनलाईन ४ लाख ३५ हजार ९८० रुपयांची रक्कम लांबवली. याप्रकरणी, नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे अधिक तपास करीत आहेत.

अशी घडली घटना

ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात राहणारे विरकर बुधवारी सकाळी घरी असताना त्यांच्या मोबाईलवर, “तुमची जन्मतारीख चुकीची असल्या कारणाने एसबीआयचे खाते बंद करण्यात येत आहे. असा मजकूर असलेला मेसेज आला. हा मजकूर संतोष श्रीवास्तव असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने पाठवल्याने विरकर यांनी त्याला त्याच क्रमांकावर पुन्हा फोन केला. तेव्हा, खाते सुरु ठेवायचे असेल तर संपूर्ण माहिती द्यावी लागेल. अशी गळ भामट्याने घातली. त्यानुसार विरकर यांनी एसबीआय आणि ग्रेटर बँकेच्या आपल्या बचत खात्याची संपूर्ण माहिती तसेच, ऑनलाईन आयडी व पासवर्ड क्रमांक भामट्याला दिला. त्यानंतर काही वेळातच दोन्ही बँक खात्यातून ४ लाख ३५ हजार ९८० रक्कम आयडीएफसी बँकेत ऑनलाईन वळती केली, अशी तक्रार विरकर यांनी बुधवारी रात्री नौपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.

First Published on: November 28, 2019 8:30 PM
Exit mobile version