महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये एकच शिक्षक !

महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये एकच शिक्षक !

मुंबई महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नगरसेवकांसह पालकांकडूनही होत असतानाच महापालिका आपल्या प्राथमिक शाळांमध्ये सर्व विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक नेमण्याच्या भूमिकेवर कायम आहे. खासगी शाळांप्रमाणे महापालिका शाळांमध्ये प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण होते, असा अजब दावा शिक्षण विभागाने केला आहे. त्यामुळे एकाच शिक्षकाने सर्व विषय शिकवणे श्रेयस्कर वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञान, भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयातील प्रत्येक किमान एक याप्रमाणे प्रशिक्षित पदवीधर अर्हताधारक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. इयत्ता १ ते ५ मधील विद्यार्थी हे ६ ते १० वर्षे या वयोगटातील असतात. या इयत्तांच्या अभ्यासक्रमाची कठीण पातळी व विद्यार्थ्यांंचा वयोगट लक्षात घेता एकाच शिक्षकाने सर्व विषय शिकवणे श्रेयस्कर वाटते. एखाद्या विषयाच्या अभ्यासात जे विद्यार्थी मागे पडतात, त्यांना उपचारात्मक शिक्षण देऊन गुणवत्ता वाढविण्याबाबतचे प्रयत्न त्या शिक्षकांकडून केले जातात.

या इयत्तातील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता विषयानुसार शिक्षक नेमल्यास विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकाबाबत भीती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादा शिक्षक, प्रशिक्षक निवडणूक कामकाज किंवा घरगुती कारणामुळे शाळेत उपस्थित राहू शकला नाही तर मुलांचे नुकसान होऊ शकते. म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रत्येक विषयाच्या तासाकरता वेगवेगळे शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ.सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. त्या सूचनेवर अभिप्राय देताना महापालिका शिक्षण विभागाने प्रत्येक विषयांकरता वेगवेगळे शिक्षक उपलब्ध करून देता येऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले.
घरगुतीसह अनेक कारणांमुळे शिक्षक शाळांमध्ये उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांकरता शिक्षक उपलब्ध केल्यास एखाद्या विषयाचा शिक्षक शाळेत गैरहजर राहिल्यास या विषयाचा तास दुसरा शिक्षक घेऊ शकतो किंवा जरी दुसर्‍या शिक्षकाला या वर्गावर जाऊन शिकवणे शक्य नाही झाले तर विद्यार्थ्यांचा पूर्ण दिवस वाया जाणार नाही.

वेगवेगळ्या विषयांसाठी शिक्षक दिल्यास शिक्षणाचा दर्जाही राखण्यास मदत होईल, असे डॉ. सईदा खान यांचे म्हणणे होते. शिक्षण समिती सदस्या सोनम जामसूतकर यांनीही याचा तीव्र विरोध दर्शवत, जर खासगी शाळांमध्ये स्वतंत्र विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक आहेत, तर मग महापालिका शाळांमध्ये अडचण काय आहे. मुळात महापालिका शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी अशी प्रशासनाची इच्छाच दिसत नाही. त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्या ऐवजी तो कसा खालावला जाईल, याचाच प्रशासन विचार करत असल्याचा आरोप केला.

First Published on: November 17, 2019 6:24 AM
Exit mobile version