बाळासाहेब ठाकरे स्मारक भुमिपूजन सोहळा: फडणवीस, राज यांना निमंत्रण नाही

बाळासाहेब ठाकरे स्मारक भुमिपूजन सोहळा: फडणवीस, राज यांना निमंत्रण नाही

बाळासाहेब ठाकरे स्मारक भुमिपूजन सोहळा: फडणवीस, राज यांना निमंत्रण नाही

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रितामध्ये जागा देण्यात आली नाही. फडणवीस यांना या कार्यक्रमाचे कसलेही निमंत्रण देण्याचे ठाकरे सरकारने टाळल्यामुळे आता नविनच राजकारण सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपच्या देवेंद्र फडणवीससह एकाही नेत्याला भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण न दिल्याने शिवसेनेने भाजपला या कार्यक्रमापासून दूर ठेवलेले आहे. आज (३१ मार्च रोजी) सायंकाळी ५.३० वाजता दादरच्या महापौर निवास येथे हा कार्यक्रम होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ होणार असून कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे.

साधारपणे राज्य सरकारच्या कोणत्याही बड्या कार्यक्रमात किंवा भूमिपूजन कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र गेल्या काही महिन्यात कोरोना रोखण्याच्या अंमलबजावणीच्या उपाययोजनेबाबत आणि सचिन वाझे प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केल्याचे दिसते. असे असले तरी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी देण्यात आलेली दादर येथील महापौर निवासाची जागा ते स्मारक उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मिळवल्या होत्या. केंद्र सरकारकडून लागणाऱ्या परवानग्यांसाठी फडणवीस सरकारने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी स्मारकाबाबत सर्व परवानगी दिल्या होत्या, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात भरीव अशा निधीची तरतूद केल्यानंतर भाजपकडून याचे स्वागतच करण्यात आले होते. असे असले तरी आज ३१ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते फडणवीस यांना वगळण्यात आलेले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण द्यावे की देऊ नये याबाबत शिवसेनेत दोन मतप्रवाह होते अखेर स्मारक समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि सचिव सुभाष देसाई यांच्याकडून फडणवीस यांच्या उपस्थितीला रेड सिग्नल देण्यात आल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमातून खात्रीलायकरित्या समजते. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक बनवण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यावर असून मेंसस टाटा प्रोजेक्ट लिमिटेड हे या संपूर्ण स्मारक प्रकल्पाचे कंत्राटदार आहेत. तर आभा नारायण लांबा असोसिएटस या वास्तुविशारद आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. फडणवीस यांच्या प्रमाणेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर स्मारकाच्या सदस्य आणि भाजप खासदार पुनम महाजन यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेत दिसत नाही. त्यामुळे भाजपच्या एकाही नेत्याला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही किंवा निमंत्रण पत्रिकेवर नावही नाही त्यामुळे भाजपला या कार्यक्रमापासून शिवसेनेने दूर ठेवल्याची चर्चा मंत्रालयात सुरु आहे.

बाळासाहेबांनी पहिले आमंत्रण फडणवीसांना दिले असते – राणे

आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर पहिले आमंत्रण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिले असते. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत! असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमाला का बोलावले नाही असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

सर्वांना अभिमान वाटेल असे स्मारक करण्याचा निर्धार – सुभाष देसाई

सर्वांना अभिमान वाटेल आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उंचीला साजेसं असे स्मारक करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून आज दि.३१ मार्च रोजी या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना मंत्री देसाई यांनी सांगितले की, सायंकाळी साडे पाच वाजता महापौर निवास, दादर, येथे हा कार्यक्रम होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ होणार असून त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजुस तर दुसऱ्या बाजुस अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. या स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिध्द वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तु उभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

First Published on: March 31, 2021 8:10 AM
Exit mobile version