मालमत्ता कराविरोधात 27 गावांचा आज केडीएमसीवर मोर्चा

मालमत्ता कराविरोधात 27 गावांचा आज केडीएमसीवर मोर्चा

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांतील मालमत्तांना कोणतेही निकष न लावता भरामसाठ करवाढ (घरपट्टी) केल्याच्या व 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी सोमवार 16 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कडोंमपा मुख्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वपक्षीय युवा मोर्चासह सलग्न आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

विकासाच्या गोंडस नावाखाली 27 गावांतील शेतकर्‍यांच्या शेत जमिनी आरक्षित भूखंडासाठी गिळंकृत करण्यासाठी ही गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. कोणत्याही नागरी सुविधा नसताना मालमत्ता कर मात्र 10 पटीने आकारण्यास सुरुवात केली आहे. कोणतेही निकष न लावता केवळ ग्रामपंचायतीमधील नोंदीनुसार या गावातील मिळकतींना नवीन मूल्यांकानुसार मालमत्ता कर आकारणीला सुरुवात केली आहे. हाच मालमत्ता कर शहरी भागामधील जुन्या मालमत्तांना तत्कालीन ग्रामपंचायत मूल्यांकानुसार येत असताना 27 गावांतील नागरिकांना वेगळा न्याय का? असा सवाल गावकरी उपस्थित करीत आहेत.

तसेच आरोग्य केंद्र, मराठी शाळा आजही जिल्हा परिषदे अंतर्गत असताना मालमत्ता करामध्ये शिक्षण करही घेतला जातो. गावातील अंतर्गत रस्ते, गटार, पायवाटा, पथदिव्यांची वाताहत झाली असताना कर मात्र भरमसाठ पद्धतीने आकारले जात आहे. अग्यार समिती अहवालानुसार आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. त्यातच 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबतचा अध्यादेश राज्य शासनाने प्रसिद्ध केला. जर गावांचा विकास करता येत नसेल तर तसा महासभेतील ठराव राज्य शासनास पाठवावा व येथील मालमत्तांना ग्रामपंचायत मूल्यांकानुसार कर आकारणी करावी, अशी मागणी या मोर्चाद्वारे करणार आहोत.

First Published on: December 16, 2019 2:55 AM
Exit mobile version