मुंबईतील साथीचे आजार आटोक्यात 

मुंबईतील साथीचे आजार आटोक्यात 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या आवश्यक उपाययोजनांमुळे यंदा साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यात यश आले. त्यातही ऑगस्टमध्ये मलेरिया व सप्टेंबरमध्ये लेप्टो व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये काहीशी वाढ झाली होती. मात्र ऑक्टोबरमध्ये साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळत आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढलेे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पालिका प्रशासनासमोर साथीच्या आजारांचे आव्हानही उभे राहिले होते. त्यानुसार पालिकेने आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेतल्या. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा साथीच्या आजारांमध्ये लक्षणीयरित्या घट झालेली दिसून आली. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मुंबईमध्ये मलेरिया, लेप्टो व डेंग्यूंच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली. मात्र ही वाढ गतवर्षीच्या तुलनेत फारच कमी होती. ऑक्टोबरमध्ये मलेरियाचे १६०, गॅस्ट्रो ३१, लेप्टो १५ तर डेंग्यूचा अवघा १ रुग्ण सापडला आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये साथीच्या आजारांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.

सोसायटीच्या परिसरात असलेले थर्माकोल बॉक्स, पत्र्याचे डबे, नारळाच्या करवंट्या, टायर हे हटवून पाणी कोठे साचणार नाही याची काळजी पालिकेकडून घेण्यात आली. त्याचबरोबर लेप्टोची साथ पसरवणारे उंदीर आणि कुत्रे यांचे आश्रयस्थान असलेले घाणीचे ढिगारे नष्ट करण्यात आले. त्यामुळे साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे दिसून येत होते. सप्टेंबरमध्ये मुंबईत मलेरियाचे ६६१, गॅस्ट्रो ९१, लेप्टोचे ५४, हेपटाईटीस १५ आणि डेंग्यूचे १४ रुग्ण आणि स्वाईन फ्लूचा अवघा एक रुग्ण सापडला होता.

ताप, थंडी, डोकेदुखी, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. उपचाराकडे दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतण्याची शक्यता आहे. आरोग्यासंदर्भात काही समस्या असल्यास पालिकेच्या ०२२२४११४००० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.
– डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका
First Published on: October 15, 2020 4:08 PM
Exit mobile version