रुग्णालयांसह कोविड आरोग्य केद्रांमध्ये ऑक्सिजनचा प्रेशर वाढणार

रुग्णालयांसह कोविड आरोग्य केद्रांमध्ये ऑक्सिजनचा प्रेशर वाढणार

कोरोना बाधित रुग्णांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावे लागते. त्यामुळे सद्यस्थितीत रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनची जास्त मागणी लक्षात घेता महापालिकेच्या रुग्णालयांसह कोविडच्या समर्पित आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे प्रमाण वाढवत प्रेशर वाढवला जाणार आहे. त्या दृष्टीकोनातून २० ठिकाणी २ लाख ८ हजार लिटर ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमता निर्माण करण्यात येत आहे. कस्तुरबासह तीन प्रमुख रुग्णालये तसेच कोविडच्या जंबो फॅसिलिटीमध्येही ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमता वाढवण्यात येत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढली असताना त्यांच्यासाठी रुग्णशय्यांची (बेड) संख्यादेखील वाढवण्यात आली आहे. यामध्ये विशेषत: ऑक्सिजन पुरवठ्याची सोय असलेल्या रुग्णशय्यांचा समावेश करण्यात आला आहे. इतर आजारांच्या रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा कायम ठेवून कोरोना बाधित रुग्णांना सातत्याने ऑक्सिजन पुरवावे लागते. त्यामुळे एरवीपेक्षा ऑक्सिजन पुरवठ्याची अधिक गरज भासू लागली. ही बाब वेळीच लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने नियोजन केले आणि निरनिराळी मोठी रुग्णालये व भव्य कोरोना उपचार केंद्र (जम्बो फॅसिलिटी) मिळून १४ ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर केली आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम आता टप्प्याने करण्यात येत आहे. या समवेत इतर ६ रुग्णालयांमध्ये देखील गरजेनुसार याप्रकारची यंत्रणा उभारण्यात आली आहे.

ऑक्सिजन यंत्रणा उभारण्यासाठी १३ हजार किलो लिटर र व ६ हजार किलो लिटर अशा दोन प्रकारातील अवाढव्य ऑक्सिजनच्या टाक्या विविध १४ ठिकाणी लावण्याचे निश्चित करण्यात आले. तर इतर ६ रुग्णालयांमध्ये १ हजार लीटर क्षमतेच्या टाक्या लावण्याचे ठरवण्यात आले. ऑक्सिजन पुरवठ्याची ही कामे पूर्णत्वास येऊन प्रत्यक्ष पुरवठा सुरु करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालय, बोरिवलीचे भगवती रुग्णालय, गोवंडीचे शताब्दी रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, गोरेगाव स्थित नेस्को कोरोना उपचार केंद्र आदी ठिकाणी मिळून १०० ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्सदेखील पुरवण्यात येत आहेत.

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सहआयुक्त (अभियांत्रिकी) राजीव कुकनूर, प्रमुख अभियंता (रुग्णालये पायाभूत सुविधा) आनंद कदम, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) (प्रभारी) कृष्णा पारेकर, कार्यकारी अभियंता (रुग्णालये पायाभूत सुविधा) अनिल क्षीरसागर, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) (दक्षिण) संजय शिंदे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांतून ही कामे आता पूर्णत्वाकडे आली आहेत.

विविध ८ कोरोना उपचार केंद्रांची नावे: (ऑक्सिजन क्षमता व कंसात टाकींची संख्या)

वरळी एनएससीआय डोम १३ हजार लिटर (१), महालक्ष्मी रेसकोर्स १३ हजार लिटर (१), दहिसर टोल नाका १३ हजार लिटर (१), दहिसर बस आगार १३ हजार लिटर (१), मुलूंड येथील रिचर्डसन क्रूडास १३ हजार लिटर (२), गोरेगाव नेस्को १३ हजार लिटर (२), वांद्रे –कुर्ला संकुल (भाग १) १३ हजार लिटर (१), वांद्रे-कुर्ला संकुल (भाग २) १३ हजार लिटर (१).

विविध ६ रुग्णालयांची नावे: (ऑक्सिजन क्षमता व कंसात टाकींची संख्या)

शीव (सायन) येथील महानगरपालिका रुग्णालय ६ हजार लिटर (१), कस्तुरबा रुग्णालय ६ हजार लिटर (१), नायर रुग्णालय १३ हजार लिटर (१) आणि ६ हजार लिटर (१), केईएम रुग्णालय १३ हजार लिटर (१), घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय ६ हजार लिटर (१), कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालय ६ हजार लिटर (१).

इतर ६ रुग्णालयांची नावे : (ऑक्सिजन क्षमता व कंसात टाकींची संख्या)

भगवती रुग्णालय १ हजार लिटर (२), कुष्ठरोग उपचार रुग्णालय १ हजार लिटर (१), धारावी नागरी आरोग्य केंद्र १ हजार लिटर (२), गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय १ हजार लिटर (१), कुर्ला भाभा रुग्णालय १ हजार लिटर (२), कामाठीपुरा नेत्र रुग्णालय १ हजार लिटर (१).

First Published on: June 18, 2020 7:59 PM
Exit mobile version