PACL Scam: संजय राऊतांना धक्का; निकटवर्तीयाची कोट्यवधींची मालमत्ता ईडीकडून जप्त

PACL Scam: संजय राऊतांना धक्का; निकटवर्तीयाची कोट्यवधींची मालमत्ता ईडीकडून जप्त

संजय राऊतांना धक्का; निकटवर्तीयाची कोट्यवधींची मालमत्ता ईडीकडून जप्त

मुंबई: पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांची 73 कोटी 62 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 116 कोटी 27 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. (PACL Scam Shock to Sanjay Raut Property worth crores of Pravin Raut seized by ED)

पत्राचाळ जमीन घोटाळा, 1,034 कोटी रुपयांचा आहे. मुंबईतीली गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र नवनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.

प्रवीण राऊतांवर आरोप काय?

पत्रचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण राऊत यांच्यावर आहे. 3 हजार फ्लॅट बांधायचे होते त्यापैकी 672 फ्लॅट इथल्या भाडेकरूंना तर उरलेले म्हाडा आणि विकासक यांना मिळणार होते. पण प्रवीण राऊत यांनी कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. त्यानंतर भुखंडाचा काही भाग इतर खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

ईडीकडून याआधी प्रवीण राऊत यांची अलिबागमधील मालमत्ताही जप्त केली आहे. यात आठ भूखंड आणि वर्षा राऊत यांच्या फ्लॅटचा समावेश होता. आतापर्यंत एकूण 116 कोटींहून जास्त किंमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात प्रवीण राऊत यांच्यासह भागीदारांची पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे इथल्या जमिनीही आहेत.

पत्राचाळ घोटाळा काय आहे?

गेल्या 2006 मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. 2008 मध्ये या प्रकल्पाला सुरूवात झाली. पण, दहा वर्षांनंतरही पुनर्विकास झाला नसल्याचं लक्षात आलं. मूळ 678 रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाच्या घरांनादेखील बिल्डरने चुना लावल्याची माहिती होती. या बिल्डरने म्हाडाला 1 हजार 37 कोटींचा चुना लावला होता. बिल्डरने विक्रीसाठी असलेले क्षेत्र सात त्रयस्थ विकासकांना विकल्याचा आरोप या बिल्डरवर होता. गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचे संचालक राकेश वाधवान आहेत. जे सध्या तुरुंगात आहेत.

राकेश वाधवानसोबत मिळून संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनी पत्राचाळ पुनर्विकासात घोटाळा केल्याचा ईडीला संशय होता. त्यामुळे संजय राऊतांना अटकदेखील करण्यात आली होती. आता संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या संपत्तीवर टाच आली आहे. याच घोटाळ्यातील पैसा संपत्ती घेण्यासाठी वापरण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे.

तसंच, संजय राऊत यांचे स्नेही प्रवीण राऊत यांचीही मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. आतापर्यंत 116 कोटी 27 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.


Edited By- Prajakta Parab

First Published on: April 24, 2024 3:28 PM
Exit mobile version