लग्नासाठी पाकिस्तानी व्यक्तीने भारतीय तरुणीची केली फसवणूक

लग्नासाठी पाकिस्तानी व्यक्तीने भारतीय तरुणीची केली फसवणूक

एका पाकिस्तानी व्यक्तीने मुंबईमध्ये राहणाऱ्या तरुणीची फसवणूक केली आहे. मेट्रोमोनियल साईटवर भारतीय असल्याचा दावा करत या व्यक्तीने या तरुणीची फसवणूक केली आहे. ही गोष्ट ज्यावेळी या तरुणीच्या लक्षात आली त्यावेळी तिने लग्नाला नकर दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या या व्यक्तीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित तरुणी मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करते. याप्रकरणी तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

लग्नासाठी त्याने तिला फसवले

पाकिस्तानी व्यक्तीने या तरुणीला मेट्रोमोनियल साईटवरुन रिक्वेस्ट पाठवली होती. त्यामध्ये त्याने तिला भारतीय असल्याचे सांगितले होते. तो डॉक्टर असून सध्या लंडनमध्ये एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याचा दावा त्याने केला होता. तसंच तो नागपूरचा रहिवासी असून पुढील काही दिवसांमध्ये भारतामध्ये परत येण्याची तयारी केली असल्याचे त्याने या तरुणीला सांगितले होते.

त्याच्या हेतूबद्दल तिला येत होता संशय

पीडित तरुणीने त्याला त्याच्या आवडी- निवडीसंदर्भात प्रश्न विचारले. तेव्हा तो ते सांगण्यास नकार देत होता. मात्र तिला तिच्या आवडी-निवडीसंदर्भात विचारत होता. स्वत:बद्दल काही न सांगता तो तिच्याच बद्दल विचारपूस करत होता. तेव्हा या तरुणीला त्याच्याबद्द्ल संशय आला. या संशयावरुन तिने, लंडनमध्ये तो ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याचा दावा करत होता. त्या हॉस्पिटलमध्ये फोन करुन विचारणा केली असता असा कोणताच व्यक्ती याठिकाणी काम करत नसल्याचे हॉस्पिटलने सांगितले.

आरोपीचे लग्न झाले असून तीन मुलं आहेत

अखेर तिने या पाकिस्तानी व्यक्तीने शेअर केलेले काही फोटो पाहिले. त्यामधील एका फोटोवर तिला फोटो स्टुडिओचा फोन नंबर मिळाला. या व्यक्तीसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तिने थेट फोन केला. हा नंबर पाकिस्तानमधील एका व्यक्तीचा होता. तो आरोपीचा मित्र असल्याचे त्याने सांगितले. त्याने जे काही सांगितले ते एेकल्यानंतर या तरुणीला धक्का बसला. ज्या व्यक्तीने तिला मेट्रोमोनियल साईटवरुन रिक्वेस्ट पाठवली होती तो पाकिस्तानचा होता. आणि त्याचे लग्न झालेले असून त्याला तीन मुलं असल्याचे समोर आले.

लग्नाला नकार दिल्याने दिली जीवे मारण्याची धमकी

हा संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर पीडित तरुणीला तिची फसवणूक केली जात असल्याचे लक्षात आले. तिने या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने तिला मारण्याची धमकी दिली. तिने याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: July 19, 2018 8:47 PM
Exit mobile version