पालघर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता

पालघर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या भारती कामडी आणि उपाध्यक्षपदी निवडून आलेले नीलेश सांबरे

पालघर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आली. अध्यक्षपदी शिवसेनेच्या भारती कामडी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलेश सांबरे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अडीच वर्षांचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून पुढची अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद तर उपाध्यक्षपद शिवसेनेला दिले जाणार आहे.

पालघर जिल्हा परिषदेत 18 जागा जिंकत शिवसेना मोठा पक्ष बनला आहे. तर त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागा जिंकल्या आहेत. शनिवारी झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून पाच पंचायत समित्यांवर सत्ता मिळवली होती. त्यामुळे आजच्या निवडणुकीत हीच आघाडी कायम राहील हे निश्चित होते. त्यानुसारच महाविकास आघाडी होऊन पालघरवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली.

पालघर जिल्हा परिषदेवर दुसर्‍यांदा सदस्य म्हणून निवडून आलेल्या भारती भरत कामडी यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून निलेश भगवान सांबरे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी घोषित केले. मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत तीन महिला उमेदवारांनी अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मनिषा यशवंत बुधर, भारती भरत कामडी, सुरेखा विठ्ठल थेतले यांनी अध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राला अनुक्रमे मनिषा मनोहर निमकर, वैशाली विजय करबट, ज्योती प्रशांत पाटील यांनी सूचक म्हणून मान्यता दिली. तर विष्णू लक्ष्मण कडव, निलेश भगवान सांबरे, जयवंत दामू डोंगरकर यांनी उपाध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राला अनुक्रमे नीलिमा सुरेश भावर, हबीब अहमद शेख, महेंद्र चंद्रकांत भोणे यांनी अनुक्रमे सूचक म्हणून मान्यता दिली.

प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी केली असता छाननीअंती सर्व नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी सांगितले. छाननीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला. यात अध्यक्षपदाच्या मनीषा बुधर आणि सुरेखा थेतले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भारती कामडी यांचे अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष पदाचे उमेदवार विष्णू कडव आणि जयवंत डोंगरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निलेश सांबरे यांचे नाव निश्चित झाले. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे, उपजिल्हाधिकारी (साप्रवि) किरण महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. पालघर, चंद्रकांत वाघमारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, संघरत्ना खिल्लारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी.ओ.चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी, सर्व जि.प.सदस्य, पंचायत समिती सभापती उपस्थित होते.

दरम्यान, पालघर जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्यात मोठे योगदान असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुनील भुसारा आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

First Published on: February 19, 2020 2:37 AM
Exit mobile version