पंकजा मुंडेंच्या ट्विटरवरुन ‘भाजप’ गायब

पंकजा मुंडेंच्या ट्विटरवरुन ‘भाजप’ गायब

विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरील भाजपचा उल्लेख डिलीट केल्याची माहिती समोर येत आहे. पंकजा यांच्या या कृतीने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. त्यातच काल पंकजा यांनी फेसबुक पोस्ट करत १२ डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान नाशिकच्या दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांच्याबाबत वक्तव्य केले आहे.

…म्हणून भाजपचा उल्लेख काढला असावा

यंदा विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर त्या काहीशा नाराज असल्याचे दिसत आहे. दरम्यान पंकजा सध्या कोणत्याच सभागृहाच्या प्रतिनिधी नसल्याने कदाचित त्यांनी भाजपचा उल्लेख काढला असावा असे देखील म्हटले जात आहे.

१२ डिसेंबर रोजी कळेल – संजय राऊत

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, पंकजा मुंडेच नाही तर भाजपची अनेक दिग्गज मंडळी शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असे म्हणत पंकजा मुंडेंबाबत १२ डिसेंबर रोजी कळेल असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

पंकजा यांची फेसबुक पोस्ट

दरम्यान काल पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट केली होती. यामध्ये १२ डिसेंबर रोजी गोपीनाथगडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे १२ डिसेंबर रोजी राज्याच्या राजकारणात आणखी एक घडोमोड घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on: December 2, 2019 12:38 PM
Exit mobile version