पनवेलमध्ये तीन मुलींचा डबक्यात बुडून दुर्देवी मृत्यू

पनवेलमध्ये तीन मुलींचा डबक्यात बुडून दुर्देवी मृत्यू

बुडून मृत्यू

नवी मुंबईमध्ये डबक्यात बुडून तीन मुलींचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पनवेल रेल्वे स्थानकाच्या फलाट रुंदीकरणासाठी हा खड्डा खोदला होता. या डबक्यामध्ये पोहण्यासाठी या तीन लहान मुली उतरल्या होत्या मात्र त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. रोहिता भोसले, रेशम भोसले, प्रतीक्षा भोसले असं या मृत मुलींची नावं आहेत. या घटनेनंतर रेल्वेप्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अशी घडली घटना

पनवेल रेल्वे स्थानकालगत अंडरपास तयार करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे याठिकाणी खड्डे खोदण्यात आले होते. या खड्ड्यामध्ये पाणी साचले होते. आज दुपारी ३ वाजताच्या दरम्यान रेशम भोसले (१३), रोहिता भोसले (१०) आणि प्रतीक्षा भोसले (०८) या तीन मुली खेळता खेळता या खड्ड्यामध्ये पोहण्यासाठी उतरल्या. दरम्यान या डबक्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. जवळून जाणाऱ्या काही तरुणांनी या मुलींना डबक्यात बुडताना पाहिले. त्यांनी या मुलींना वाचण्याचा प्रयत्न केला. तिघींना डबक्याच्या बाहेर काढण्यात आले.

फुगे विकण्याचे काम करत होत्या

या तीन मुलींपैकी एकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. दुसऱ्या मुलीला पालिका रुग्णालयात हालवण्यात आले. तर तिसऱ्या मुलीला एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तिन्ही मुली मुळच्या अमरावतीच्या असून आई वडिलांसोबत पनवेलमध्ये राहत होत्या. या तिन्ही मुली त्यांच्या कुटुंबीयांसोबत फुगे विकण्याचं काम करत होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

First Published on: November 19, 2018 8:19 PM
Exit mobile version