करोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून मलबार हिल विधानसभा क्षेत्र असलेला महापालिकेचा ‘डी’ विभाग हा दुसर्या किंवा चौथ्या क्रमांकावर कायमच होता. परंतु या विभागाच्या सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी भायखळा, माजगाव या महापालिकेच्या ‘ई’ विभागाची प्रभारी जबाबदारी असतानाही या ‘डी’ विभागाकडे लक्ष कमी होऊ दिले नाही. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपर्यंत टॉप फाईव्हमधील आपले स्थान सोडून या विभागाने करोनाग्रस्तांच्या यादीत १६ व्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. मात्र, शांत झालेल्या मलबाल हिल, नेपियन्सी आदी परिसरांमध्ये पुन्हा एकदा रुग्ण आढळून येत आहेत. नव्याने घरकाम करणार्या नोकरांना कामावर घेण्यापूर्वी करोना चाचणी करण्यात येत आहेत. या चाचणींमध्ये बहुतांशी नोकरांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे चित्र समोर येत आहे.
मलबार हिल विधानसभा क्षेत्र मोडणार्या महापालिकेच्या डी विभागात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या सध्या १५५९ एवढी आहे. मात्र, १२ एप्रिल रोजी याच विभागात बाधित रुग्णांची संख्या ९७ एवढी होती. त्यामुळे अवध्या दोन महिन्यांमध्ये ही संख्या १४५० पेक्षा अधिक वाढली आहे. पण सध्या रुग्णांची संख्या १५५९एवढी झाली असली तरी रुग्ण दरवाढीचे प्रमाण हे २.७ टक्के एवढे आहेत. या विभागात पहिले रुग्ण हे मलबारहिल, नेपियन्सी रोडवर आढळून आले होते. त्यानंतर जसलोक, ब्रिचकँडी व भाटीया रुग्णालयांमध्ये रुग्ण आढळून आले. त्यानंतर माळीभवन, नारायण वाडी, पारेख वाडी, खेतवाडी, उरणकरवाडी,दया सागर झोपडपट्टी, खटावचाळ,बीआयटी चाळ, तुळशीवाडी, शिमला नगर झोपडपट्टी या मोठ्या वस्त्यांसह गायवाडी, श्रीपती कॅस्टल, अटल हाऊस, निकदवरी लेन, खटावकर भवन, गवालिया टँक रोड, नाना चौक, लॅमिग्टन रोड, बाबुलनाथ रोड, मुंबई सेंट्रल रोड, पेडर रोड, बी.डी रोड,ताडदेव रोड, तेजपाल रोड आदी भागांमध्ये रुग्ण आढळून येवू लागले.
सध्या या विभागात रुग्ण दरवाढीचे प्रमाण हे २.२४ एवढे असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ३० दिवसांवर आला आहे. तुळशीवाडीचा परिसर, खेतवाडी आणि बीआयटी चाळींमध्ये सध्या काही प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. या विभागात जे एकूण रुग्ण आढळून आले आहेत, त्यातील ५० ते ६० टक्के रुग्ण हे तीन प्रमुख रुग्णालयांसह आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलिस, महापालिका, रेल्वे आदींमधील कर्मचारी आहेत. मात्र, बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेवून त्यांची जास्तीत जास्त चाचणी करण्यावर आम्ही सुरुवातीपासून भर दिला होता. त्यामुळे या विभागातील रुग्णांची आकडेवारी सुरुवातीपासून वाढलेली पहायला मिळत होती. परंतु आज इमारतीतील लोकांपेक्षा झोपडपट्टींमधील लोकांपर्यंत पोहोचून त्यांची तपासणी करून त्यातून रुग्ण शोधणे हीच महत्वाची बाब आहे. त्यामुळे याकडेच आम्ही अधिक भर दिला असल्याचे ‘डी’विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी स्पष्ट केले.
मुगभाट लेन, खाडिलकर रोड, मुंबादेवी आदी भागांमध्ये सध्या रुग्ण आहेत. मात्र, जोवर लोक रस्त्यांवर कमी गर्दी करत नाही तोवर हा आजार नियंत्रणात येणारा नाही. महापालिकेच्यावतीने रेशनकार्ड नसलेल्यांना रेशन उपलब्ध करून दिले जाणार होते. परंतु आमच्याकडून त्यांचे नंबर आणि आधारकार्ड क्रमांक घेवूनही दिले नाही.
-अनुराधा पोतदार-झव्हेरी, स्थानिक नगरसेविका,भाजप
माझ्या विभागात घाडी अड्डा, तुळशीवाडी, गोकुळधाम आदी भागांमध्ये रुग्ण आहेत. आतापर्यंत आढळून आलेले बरेच रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. नायर रुग्णालयांमध्ये एकवेळ रुग्णाला खाट मिळेल, पण येथील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखलच करून घेतले जात नाही. -अरुंधती दुधवडकर, स्थानिक नगरसेविका, शिवसेना.
पोलिस कंपाऊंड, एम.पी. मिल कंपाऊंड आदी ठिकाणी रुग्ण आहेत. परंतु सध्या सर्वांत मोठी समस्या आहे ती कोविडच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची. त्यांच्यासाठी ना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत, ना रुग्णालयांमध्ये व्यवस्था होत.
-सरीता पाटील, स्थानिक नगरसेविका,भाजप