बील भरल्याशिवाय मृतदेह देण्यास नकार; एम्स हॉस्पिटलबाहेर नातेवाईकांचा ठिय्या

बील भरल्याशिवाय मृतदेह देण्यास नकार; एम्स हॉस्पिटलबाहेर नातेवाईकांचा ठिय्या

रुग्णाच्या नातेवाईकांचा एम्स रुग्णालयाबाहेर ठिय्या

डोंबिवलीमधील एम्स हॉस्पीटलने संपूर्ण बील भरल्याशिवाय मृतदेह देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी हॉस्पिटलबाहेर ठिय्या आंदोलन केले. ठिय्या आंदोलनानंतर हॉस्पिटलकडून बील माफ करण्यात आल्याचे सांगून हॉस्पीटल प्रशासने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

उपचारा दरम्यान रुग्णाचा मृत्यू

डोंबिवली पूर्वेतील त्रिमुर्तीनगर वसाहतीत राहणारे रविंद्र अहिरे वय ५० यांना मध्यरात्री एक वाजता एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. डिपॉझीट भरण्यासाठी हॉस्पिटलने रूग्णाकडे मागणी केली होती. सकाळी आठ वाजता त्यांच्या नातेवाईकांनी कसेबसे ५० हजार ९४८ रूपये हॉस्पीटलमध्ये जमा केले. उपचारा दरम्यान अहिरे यांचा मृत्यू झाला. त्यावेळी हॉस्पीटलने ७८ हजार १३८ रूपये बील नातेवाईकांच्या हातावर ठेवले.

हॉस्पिटल प्रशासन अखेर नमले

उर्वरित २७ हजार १९० बील भरल्याशिवाय मृतदेह मिळणार नाही असे हॉस्पीटल प्रशासनाकडून सांगण्यात आले. एका रात्रीत इतके बील कसे झाले? असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित करीत संताप व्यक्त केला. अहिरे यांचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी करून जाब विचारला. काँग्रेसचे आरोग्य सेल संयोजक जितेंद्र मुळये आणि शिवसेना शाखा प्रमुख संदीप नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण हॉस्पिटल प्रशासन बील कमी करण्यास तयार नव्हते. अखेर नागरिकांनी हॉस्पिटलबाहेर ठिय्या मांडून मृतदेह घेण्यास नकार दर्शविला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अखेर हॉस्पिटल प्रशासन नरमले आणि त्यांनी बील माफ करत मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.

First Published on: April 11, 2019 8:40 PM
Exit mobile version