‘सेना-भाजपच्या विकासकामांना जनतेची पसंती’

‘सेना-भाजपच्या विकासकामांना जनतेची पसंती’

सेना-भाजप

देशात २०१४च्या लोकसभा निवडणूकीत मोदी लाटेत भाजप आघाडी सरकार बहुमतात आले. त्यामुळे काँग्रेससह विरोधी पक्ष अस्वस्थ झाले. तेव्हा भाजप सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी विरोधकांनी अनेक क्लृप्त्या वापरल्या. सरकारला बदनाम करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाने नागरी विकास कामांचा धडाका सुरूच ठेवला. परिणामी १७व्या लोकसभा निवडणूकीत राज्यासह देशातील जनतेने पुन्हा एकदा भाजप-शिवसेना-मित्र पक्षांच्या महायुतीकडे देशाची सत्ता सोपवल्याची, प्रतिक्रिया भाजप ठाणे ग्रामिण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी व्यक्त केली आहे.

विद्यमान खासदार तथा भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी मिळवला. त्या माध्यमातून रस्ते, पाणी योजना, रेल्वे सुविधा, जलवाहतूक आदी दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. भाजप-शिवसेना, रिपाई (अ), श्रमजीवी संघटना महायुतीवर जनतेने पूर्ण विश्वास व्यक्त केल्याने कपिल पाटील यांना ५ लाख २३ हजार ५८३ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे (३६७२५४) यांच्यावर १ लाख ५६ हजार ३२९ मतांची आघाडी घेऊन दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधासभा निवडणुकांमध्ये देखील भाजप, शिवसेना, रिपाई, श्रमजीवी युतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येऊन राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीचीच सत्ता प्रस्थापित होणार आहे.

– दयानंद चोरघे, भाजप ठाणे ग्रामिण जिल्हाध्यक्ष

कपिल पाटील यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर त्यांना निवडून आल्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी दयानंद चोरघे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, आमदार रुपेश म्हात्रे, आमदार महेश चौघुले आदी मान्यवर उपस्थित होते.

First Published on: May 24, 2019 7:32 PM
Exit mobile version