संकटकाळात नांदगाव नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी गायब

संकटकाळात नांदगाव नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी गायब

नांदगाव : अतिवृष्टी व महापुराने सबवे व शहराची पुरती वाट लागलेली असतांना एकहाती सत्ता मिळालेले नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी सध्या गायब असून जनतेला आधार द्यायला कोणीच नाही असा आरोप माजी नगराध्यक्ष अरुण पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
नगरपरिषदेत एक हाती सत्ता असताना कुठलेही भरीव काम होत नाही. शहरातून जायला रस्ते नाही, रस्त्याला खड्डे पडलेले असतांना दुरुस्ती नाही, स्वच्छ पाणीपुरवठा, आरोग्य या प्रश्नांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने शहराची परिस्थिती अंधकारमय झाली असल्याचा आरोप पाटील यांनी करत नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचेवर ताशेरे ओढले. रेल्वे फाटक बंद असल्याने नव्याने उभारण्यात आलेल्या सबवेमध्ये पाणी साठत असल्याने फाटकाबाहेरील नागरिकांचा शहराशी असलेला संपर्क नेहमीच तुटत असल्याने त्यादृष्टीने प्रशासन काहीही पाऊले उचलण्यास तयार नाही. नागरिकांची केवळ दिशाभूल सुरू असून प्रशासन सक्षम नसल्याने ही वेळ नांदगावकरांवर आली आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांचे २० वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले आहे, मात्र अजूनही ते वाटप होत नसल्याने नागरिक कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.मात्र नगरपरिषद प्रशासनाला त्याचे देणे घेणे दिसत नाही. जिल्ह्यातील इतर नगरपरिषदेंना कोट्यवधी रुपयांचा निधी येत असताना नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी व प्रशासन हे सक्षम नसल्यानेच नांदगाव नगरपरिषदेला निधी मिळत नसावा. त्यामुळे गेल्या पाच वर्षात ठोस असे शहरात कुठलेही मोठे काम नाही.जे काही कामे होतात ते केवळ काही विशिष्ठ प्रभागातच सुरू असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला. केवळ आमदार निधीतून या शहरातील कामे होतात स्वतंत्रपणे नगरपरिषद मात्र कुठलाही निधी मंजूर करताना दिसत नाही. सत्ताधार्‍यांनी निवडणुकांवेळी वचननाम्यात दिलेले शुद्ध पाणी पुरवठा, शिवसृष्टी उभारणे आदी विषय हवेतच विरले असून आरोग्याच्या दृष्टीने शहरात फवारणी देखील होत नाही. प्रशासनाच्या गलथानपणामुळेच नदीवरील टपर्‍या वाहून गेल्या व शहरात पाणी शिरले होते. आम्ही सत्तेत असताना अगदी कमी निधीत अनेक विकासकामे केली आहे. आजही ते कामे शाबूत आहेत. माझ्या हाती एकहाती सत्ता असती आणि कुणाच्या दबावात जर कामे करण्याची वेळ येत असेल तर मी वैयक्तिकरित्या राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडलो असतो असेही पाटील यांनी सांगितले.दरम्यान, सत्ताधार्‍यांना कौल देत जनतेने आम्हाला नाकारल्याने साडेचार वर्ष आम्ही बघ्याची भूमिका घेतली.मात्र शहराचे होत असलेले नुकसान पाहून जीव व्यथित होत होता म्हणून पत्रकार परिषद घेऊन मनातील खंत व्यक्त करावी वाटली..भविष्यात नांदगांव शहरात विकास आघाडीच्या माध्यमातून पुढील दिशा ठरवत काम सुरू करणार असल्याचे पाटील यांनी शेवटी सांगितले. यावेळी सुभाष कवडे, नगरसेवक सूरज पाटील, फैज शेख, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

First Published on: October 12, 2021 11:01 AM
Exit mobile version