पीएचडीच्या फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांचे विद्यापीठात आंदोलन

पीएचडीच्या फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांचे विद्यापीठात आंदोलन

पीएचडीच्या फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांचे विद्यापीठात आंदोलन

पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी फेलोशिप वर्षभरापासूनच मिळाली नसल्याने आणि सध्याच्या फेलोशिपमध्ये वाढ करावी यासाठी बुधवारी ५० ते ६० विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आंदोलन पुकारले. जोपर्यंत फेलोशिपमध्ये वाढ करून मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन कायम ठेवणार असा पवित्रा घेत विद्यार्थ्यांनी विद्यापीठात ठाण मांडले आहे.

फेलोशिप देण्यासाठी ३ कोटी २४ लाखांची तरतूद करण्यात आली

गतवर्षी आंदोलन केल्यानंतर पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडून फेलोशिप देण्यात आली होती. यावर्षी फेलोशिप सुरळीत मिळेल अशी अपेक्षा असताना विद्यापीठाकडून मात्र विद्यार्थ्यांच्या तब्बल वर्षभर फेलोशिपच दिली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांना एप्रिल २०१९ पासून फेलोशिपच मिळालेली नाही. मुंबई विद्यापीठातून पीएचडी करणारे अनेक विद्यार्थी हे मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने त्यांना मिळणार्‍या फेलोशिपमुळे ट्युशन शुल्क, हॉस्टेल, जेवण, प्रबंधाची रुपरेषा ठरवणे आणि प्रबंध यासाठी लागणारा खर्च भागवणे शक्य होते. परंतु वर्षभरापासून विद्यापीठाकडून फेलोशिप न मिळाल्याने विद्यार्थ्यांना हे खर्च भागवणे शक्य होत नाही. त्यामुळे पीएचडीसाठी संशोधन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना पैशाची गणितेही मांडावी लागत आहे. याचा परिणाम अभ्यासावर होत आहे. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी ३ कोटी २४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाकडून वेळेवर मिळत नसलेली फेलोशिप ही तुटपूंजी स्वरुपाची आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरू आणि प्रकुलगुरूंकडून दुर्लक्ष

सरकारच्या नव्या अध्यादेशाप्रमाणे १४ हजार, १६ हजार आणि १८ हजार रुपये फेलोशिप देणे अपेक्षित असताना मुंबई विद्यापीठाकडून फक्त आठ हजारच फेलोशिप देण्यात येते. अन्य विद्यापीठात नियमानुसार फेलोशिप मिळत असताना मुंबई विद्यापीठाकडून देण्यात येत असलेली तुटपुंजी फेलोशिपही बंद करण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे विद्यापीठाने गतवर्षीची फेलोशिप तातडीने देण्याबरोबरच नियमानुसार असलेली वाढीव फेलोशिप देण्यात यावी, यासाठी विद्यार्थ्यांकडून बुधवारी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील आंबेडकर भवनसमोर तीव्र आंदोलन पुकारले आहे. मात्र याकडे विद्यापीठाच्या कुलगुरू आणि प्रकुलगुरूंकडून दुर्लक्ष करण्यात येत असून, विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली.


हेही वाचा – शीव हॉस्पिटलच्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांना करोनाचे प्रशिक्षण


 

First Published on: March 11, 2020 10:24 PM
Exit mobile version