बालरुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये ‘प्ले रूम’

बालरुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये ‘प्ले रूम’

हॉस्पिटलमध्ये बराच काळ उपचारासाठी राहणे प्रत्येक व्यक्तीसाठी त्रासदायक असते. त्यातच लहान मुलांना हॉस्पिटल हे नेहमीच नकोसे वाटते. त्यामुळे उपचारावेळी डॉक्टरांना अनेक अडचणी येत असतात. उपचारादरम्यान लहान मुलांचे मन हॉस्पिटलमध्ये रमले पाहिजे यासाठी कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी ‘प्ले रूम’ सुरू करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी प्ले रूम सुरू करण्याची ही पहिलीच घटना आहे.

आजारामुळे मुले फार त्रासलेली असतात. त्यांना काही करण्यास सांगितल्यास ते नकारघंटा वाजवतात. त्यामुळे त्यांची किरकिर वाढते. परंतु मुलांना खेळताना पाहून त्रासलेल्या मुलांमध्ये उत्साह निर्माण होऊन त्यांच्यामध्येही खेळण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. खेळल्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन त्यांच्याकडून उपचारासाठी चांगला प्रतिसाद मिळू शकेल ही बाब लक्षात घेऊन कुर्ला येथील पालिकेच्या भाभा हॉस्पिटल प्रशासनाने लहान मुलांसाठी वॉर्डमध्ये विशेष ‘प्ले रूम’ सुरू केले आहे. रेहबर फाऊंडेशनच्या मदतीने हा प्ले रूम सुरू करण्यात आला आहे. प्ले रूममध्ये सायकल, घोडे, कॅरम व चेंडू अशी विविध प्रकारची खेळणी आहेत. खेळाबरोबरच मुलांचा थोडास अभ्यासही व्हावा यासाठी भिंतीवर पक्षी, प्राणी,फळे, फुले यांची चित्रे, गणिताची आकडेवारीही लावली आहे. त्यामुळे नर्सरी व पहिलीमध्ये शिकणार्‍या मुलांचा अभ्यासही होण्यासही मदत होणार आहे.

प्ले रूममध्ये खेळताना मुले पडल्यास त्यांना लागू नये यासाठी रूममध्ये कार्पेट टाकण्यात आले आहे. त्यामुळे मुले बिनधास्तपणे खेळू शकतात. हा प्ले रूम उभारण्याची संपूर्ण जबाबदारी रेहबर फाऊंडेशनने उचलल्याने प्ले रूमसाठी कोणताही अतिरिक्त ताण हॉस्पिटल प्रशासनावर पडलेला नाही, अशी माहिती भाभा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णकांत पिंपळे यांनी दिली. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये सुरू केलेल्या ‘प्ले रूम’मध्ये खेळण्याला मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुले प्ले रूममध्ये खेळण्यासाठी उत्सूक असतात. मुलांना उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कंटाळा येऊ नये व उपचार व्यवस्थित होण्यासाठी सुरू केलेल्या या प्ले रूमचा नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वासही पिंपळे यांनी व्यक्त केला.

पालकांना प्ले रूममध्ये थांबण्याची परवानगी

प्ले रूममध्ये खेळायला येणार्‍या प्रत्येक मुलाची रजिस्टमध्ये नोंद केली जात आहे. मुलांवर लक्ष राहावे यासाठी पालकांनाही प्ले रूममध्ये थांबण्यास परवानगी दिली आहे, असे भाभा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक कृष्णकांत पिंपळे यांनी सांगितले.

First Published on: October 5, 2018 1:22 AM
Exit mobile version