एटीएम सेंटरमध्ये फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

एटीएम सेंटरमध्ये फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

Arrest

एटीएम मशीनमध्ये पीन सेट करण्यासाठी गेलेल्या तरुणाची फसवणूक करुन दोन जणांनी त्याच्या खात्यातील ६२,७८६ इतकी रक्कम लंपास केली होती. मुंबईतल्या गोवंडीमध्ये २७ जानेवारीला ही घटना घडली होती. अनवर जियाउद्दीन शेख हा २२ वर्षाचा तरुण गोवंडी पूर्वेडील बँक ऑफ बडोदा बँकेच्या एटीएममध्ये पीन सेट करण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी असलेल्या दोन आरोपींनी पीन सेट करण्यासाठी मदत करतो सांगत त्याची फसवणुक केली. फसवणुक झाल्याचे कळताच अनवरने याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अशी घडली घटना

अनवर शेख हा चालक आहे. तो गोवंडी पूर्वेकडील जैन मंदीराच्या बाजूला असलेल्या बँक ऑफ बडोदा बँकेच्या एटीएममध्ये नवीन पीन सेट करण्यासाठी गेला होता. त्याला पीन सेट करता येत नसल्याने आरोपी अजयकुमार मेवालाल राजभर (२३ वर्षे) आणि अब्दुल्ला जियाउद्दोन शेख (२२ वर्ष) या दोन आरोपींनी त्याला मदत करतो असे सांगत हात चलाखीने स्वत:चे एटीएम कार्ड अनवरला देवून त्याच्या बँक खात्यातून ६२,७८६ इतकी रक्कम घेवून फसवणूक केली.

आरोपींना अटक

याप्रकरणी अनवरने गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अजयकुमार मेवालाल राजभर आणि अब्दुल्ला जियाउद्दोन शेख या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. अवघ्या २४ तासात पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावला. ३० जानेवारीला पोलिसांनी दोन्ही आरोपींना नवी मुंबईच्या उलवे सेक्टर ९ येथून अटक केली. हे दोघे देखील उलवेचे रहिवासी आहेत.

First Published on: January 31, 2019 4:30 PM
Exit mobile version