फटका गँगचा चोरटा गजाआड

फटका गँगचा चोरटा गजाआड

अटक

ऑगस्ट महिन्यात फटका मारून मोबाईल पळवणार्‍या अट्टल चोरट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या चोरट्याला मुंबई गुन्हे शाखेकडून गुरुवारी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या चोरट्याकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 4 चे पोलीस नाईक अजय बल्लाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने केली.

पोलिसांचे पथक चोरट्याचा शोध घेत असताना खबर्‍याने महत्त्वाची माहिती पोलीस नाईक अजय बल्लाळ यांना दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंगरी परिसरातील हबीब रुग्णालयासमोर सापळा लावून अशरफ नईम खान (32) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने फटका मारून 5 मोबाईल लांबवल्याचे सांगितले. अशरफ याच्याविरुद्ध दरोडा, घरफोडी, चोरी असे 5 गुन्हे विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल असून तो इतके दिवस फरार होता. अशराफला पुढील तपासासाठी विक्रोळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा चोरटा सकाळच्या वेळेत चोरी करण्यासाठी रेल्वे रुळांच्या बाजूला उभा राहून आपले सावज हेरायचा आणि चोरी करताच तिथून पसार व्हायचा.

सकाळच्या वेळेत चोरी केल्यानंतर तो दिवसभर घरीच आराम करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त (ड – मध्य) नेताजी भोपळे, मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस हवालदार शिरगावकर, हवालदार बोटे, पोलीस नाईक अजय बल्लाळ, पोलीस नाईक साळुंखे, पोलीस नाईक मिंडे या पोलीस पथकाने केली.

First Published on: September 29, 2018 12:48 AM
Exit mobile version