लालबाग परिसरातील परप्रांतीय चोर गजाआड

लालबाग परिसरातील परप्रांतीय चोर गजाआड

मुंबई : सध्या लालबाग परिसरात गणेशोत्सवानिमित्ताने लाखो लोकांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत बाहेरुन आलेल्या चोरट्यांच्या टोळ्या या ठिकाणी आपले हात साफ करत होत्या.

गेल्या पाच दिवसात या परीसरात १५० पेक्षा अधिक चोेर्‍या झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. माउंट मेरी आणि लालबाग परिसरात चोरी करणार्‍या चेन्नईच्या एका तरुणाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरी केलेले तब्बल ५१ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. विकास मोहंतो असे या आरोपीचे नाव असून तो लवकरात लवकर पैसे कमवण्यासाठी मुंबईत आला होता, त्याच्यासोबत त्याचे मित्रसुद्धा होते.

गणेशोत्सवाच्या काळात होणार्‍या गर्दीचा फायदा घेत त्यांनी मोबाईल चोरायला सुरुवात केली होती. अ‍ॅपल, सॅमसंग, विवो यासारखे महागडे फोन त्याच्याकडून जप्त करण्यात आले असून सध्या त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. माउंट मेरी या परिसरात त्याने प्रथमच चोरी करायला सुरुवात केली होती त्यानंतर गावदेवी, बोरिवली आणि लालबाग परिसरात त्याने चोरी केल्याचेही कबुल केले.

त्याने चोरी केलेले मोबाईल पश्चिम बंगालमध्ये जावून तो विकणार होता, अशी माहिती सुद्धा पोलिसांना मिळाली. गेल्या पाच दिवसात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चोर्‍या बाहेरुन आलेल्या चोरट्यांच्या टोळ्या करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता, त्यानुसार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

First Published on: September 19, 2018 4:00 AM
Exit mobile version