तुमचा मास्क Original आहे का? २१ लाखाच्या बनावट N-95 मास्कसह एकाला अटक!

तुमचा मास्क Original आहे का? २१ लाखाच्या बनावट N-95 मास्कसह एकाला अटक!

कोरोनाच्या विषाणूंपासून बचावासाठी मास्क आणि सेनिटायझरचा वापर देशात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सेनिटायझर आणि मास्क तयार करणाऱ्या अनेक कंपन्या कोरोनाच्या काळात नावारूपाला आलेल्या आहेत. देशात सध्या सेनिटायझर आणि मास्कची वाढती मागणी बघून नामांकित कंपन्यांची नावे वापरून मोठ्या प्रमाणात बनावट मास्क आणि सेनिटायझर बाजारात दाखल होत आहेत. अशाच एका नामांकित कंपनीचे नाव वापरून बनावट एन – ९५ मास्कची विक्री करणाऱ्या वितरकाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी २१ लाख ३९ हजार रुपये किंमतीच्या बनावट एन-९५ मास्कचा (N-95 Mask) साठा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने केली आहे. सफदर हुसेन मोहम्मद जाफर मोमीम (४०) असे अटक करण्यात आलेल्या वितरकाचे नाव आहे. भिवंडीत राहणारा सफदर हा कोरोना सुरू झाल्याच्या काळापासून बनावट मास्कची विक्री करीत असल्याची माहिती समोर येत आहे.

लोअर परळमधून केली अटक

मुंबईतील लोअर परळ या ठिकाणी एक इसम मास्क तयार करणाऱ्या ‘विनस’ (Venus) या नामांकित कंपनीचे नाव वापरून बनावट एन- ९५ मास्कची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाला मिळाली. युनिट ३ प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, पो. नि. नितीन पाटील यांनी विनस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या कंपनीच्या अधिकाऱ्यांसह युनिट ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, पो.नि.नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पोद्दार मिल कंपाउंड, लोअर परळ येथे सापळा रचून एकाला टेम्पोसह ताब्यात घेऊन टेम्पोची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात विनस लिहलेले एन ९५ मास्क सापडले.

आरोपी सफदर हुसेन मोहम्मद जाफर मोमीम

होलसेल विक्रेत्याला विकत होता मास्क

पोलीस पथकाने ताब्यात घेतलेल्या सफदर मोमीन यांच्यासह टेम्पो ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे सर्व मास्क विनस कपंनीच्या नावाखाली होलसेल विक्रेत्याला विकत असल्याची माहिती दिली. विनस कंपनीच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सफदर मोमीन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्याजवळून सुमारे २१ लाख ३९ हजार रुपये किमतीचे बनावट एन -९५ मास्क आणि टेम्पो जप्त करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी पोनि खोत यांनी दिली. मुंबईसह ठाणे, नवीमुंबई तसेच आसपासच्या शहरात या बनावट एन ९५ ची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या वितरक सफदर याने पोलिसांना दिली आहे. १५० ते २०० रुपयांना या मास्कची विक्री होत असून अटक करण्यात आलेल्या वितरकाकडून कुठे कुठे हे मास्क पोहोचवले जात आहेत, त्याचा तपास सुरु असल्याचे खोत यांनी सांगितले.

First Published on: July 29, 2020 6:18 PM
Exit mobile version