VIDEO : उल्हासनगरमधील ‘त्या’ मर्डर केसच्या आरोपींना अखेर बेड्या!

VIDEO : उल्हासनगरमधील ‘त्या’ मर्डर केसच्या आरोपींना अखेर बेड्या!

पूर्व वैमनस्यातून दीपक भोईर या तरुणाची हत्या करणाऱ्या नरेश उर्फ बबल्या चव्हाण याच्यासह चार जणांना उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत धुळे येथून अटक करण्यात आली आहे. माणेरे गावात राहणारा मृतक दीपक भोईर याला मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगरमधील वादग्रस्त असलेल्या धुरु बारमध्ये एका बारबालेने मोबाईल फोन वरून संपर्क करून भेटायला बोलावले. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास बारमधून तिला भेटून आल्यानंतर बारच्या आवारात आरोपी नरेश उर्फ बबल्या चव्हाण आणि त्याचे साथीदार हल्ल्याच्या तयारीत होते. दीपकला पाहताच हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला.

CCTVच्या साहाय्याने ओळख पटली!

या परिसरातल्या अमन चित्रपटगृह रस्त्यावर पटेल लो प्राईस या दुकानासमोर दीपक त्याच्या मित्रा बरोबर धावत असताना तोल जाऊन पडला. याचा फायदा उचलत मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्याराने दीपकच्या पाठीवर, पोटावर, डोक्यावर, हातावर ३० हून अधिक वार केले. हा सगळा प्रकार या परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपकला नजीकच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात घेऊन गेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ८ ते १० जणांच्या टोळक्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संयुक्त तपासाचा निर्णय

दीपक भोईरच्या काकी विमल वसंत भोईर या शिवसेना नगरसेविका आहेत. त्यामुळे पोलिसांवर दबाव होता. तसेच माणेरे ग्रामस्थांनी एकत्र येत उल्हासनगर पूर्व बंदही घडवून आणला होता. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी पोलिसंनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करण्याचा निर्णय घेतला.

धुळ्यातून केली आरोपींना अटक

त्यानंतर पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती काढली. नरेश उर्फ बबल्या चव्हाण, अनिकेत शिरसाठ, राजू कनोजिया आणि योगेश लाड हे इंदौरच्या दिशेने जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले. या पथकाने धुळे येथून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चौघांना ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या आरोपींना दुपारी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

First Published on: January 22, 2020 9:07 PM
Exit mobile version