३० लाख रुपयांच्या घरफोडीचा पोलिसांकडून पर्दाफाश

३० लाख रुपयांच्या घरफोडीचा पोलिसांकडून पर्दाफाश

बोगस दस्तावेजच्या आधारे फसवणुकीप्रकरणी आरोपीस अटक

मुंबई:सुमारे तीस लाख रुपयांच्या घरफोडीचा डी. एन. नगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. त्यात पंधरा ते सोळा वयोगटातील तीन मुलांसह सुजीत सुभाष केवट या तरुणाचा समावेश आहे. त्यातील एक मुलगा तक्रारदाराचा पुतण्या असून मौजमजेसाठी त्यांनी ही चोरी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तिन्ही अल्पवयीन मुलांची डोंगरी सुधारगृहात रवानगी करण्यात आली तर सुजीत हा सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांनी सांगितले.

गोपाल गुप्ता हे अंधेरीतील जुहू गल्लीतील बीएमसी चाळीत राहतात. त्यांचा सिगारेटचा होलसेलचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. 4 ऑक्टोबरला त्यांच्या एका नातेवाइकाच्या घरी कार्यक्रम होता. त्यामुळे गुप्ता कुटुंबिय त्यांच्या नातेवाइकांकडे गेले होते, यावेळी घरात कोणीही नव्हते. हीच संधी साधून काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या तिसर्‍या मजल्यावरील पोटमाळ्यावरील छताचा सिमेंटचा पत्रा काढून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कपाटातील सुमारे तीस लाख रुपयांची कॅश घेऊन तेथून पलायन केले होते. रात्री उशिरा गोपाळ गुप्ता हे घरी आले असता त्यांना त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी डी. एन. नगर पोलिसांत घरफोडीची तक्रार केली होती.

या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंद होताच पोलीस उपायुक्त परमजीत दाहिया, सहाय्यक पोलीस आयुक्त विनय कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांच्या पथकातील गोवर्धन गिरवले, गुरव, बनकर, योगेश कदम, प्रशांत भुवड, गौतम वावळे यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सुजीत केवट या तरुणाला पोलिसांनी संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली देताना याकामी त्याला परिसरातील तीन अल्पवयीन मुलांनी मदत केल्याचे सांगितले. त्यानंतर या तिन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यात गोपाळ गुप्ता यांच्या सोळा वर्षांच्या पुतण्याचाही समावेश होता.

त्यानेच सुजीतला त्याचे सर्व नातेवाइक एका कार्यक्रमासाठी बाहेर जाणार आहे. त्यांच्या घरी लाखो रुपयांची कॅश आणि ज्वेलरी आहे, ही कॅश चोरी करुन मौजमजा करु, अशी त्यांची योजना होती. त्यानंतर या चौघांनी गोपाळ गुप्ता बाहेर गेल्यानंतर त्यांच्या घरी चोरी केली होती. चारही आरोपींकडून चोरीस गेलेली सुमारे तीस लाख रुपयांची कॅश जप्त केली आहे. ही कॅश त्यांनी एका फिटनेस सेंटरच्या लॉकरमध्ये लपवून ठेवली होती. त्यासाठी त्यांनी एक वर्षासाठी लॉकर घेऊन सहा हजार रुपये दिले होते.

First Published on: October 19, 2018 12:07 AM
Exit mobile version