मनपाच्या जकात निरीक्षकासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

मनपाच्या जकात निरीक्षकासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : महानगरपालिकेत जकात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले गुलकंद अविनाश दळवी आणि त्यांची पत्नी माधुरी गुलकंद दळवी यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला आहे. या दोघांवर सुमारे ६० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे. दळवी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. गुलकंद दळवी हे महानगरपालिकेच्या जकात विभागात निरीक्षकपदी कार्यरत होते.

त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत लाखो रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध अधिकार्‍यांनी चौकशी सुरू केली होती. या चौकशीत गुलकंद दळवी यांनी त्यांच्या कार्यकाळात ६० लाख २० हजार ३८५ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केली होती. ही मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पनापेक्षा सुमारे ६० टक्क्यांनी जास्त आहे. दळवी यांच्याकडे कायदेशीर उत्पन्नाचे साधन नसताना त्यांनी ही मालमत्ता गैरमार्गाने मिळविले होती. यातील काही मालमत्ता त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे घेतली होती.

त्यामुळे त्यांची पत्नी माधुरी दळवी यांचाही अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. चौकशीत हा प्रकार उघडकीस येताच या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कॅलिस्टस डिमेलो हे करीत आहेत. गुलकंद दळवी आणि त्यांची पत्नी माधुरी दळवी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांना देण्यात आली आहे.

First Published on: October 24, 2018 2:13 AM
Exit mobile version