पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी दोन्ही लेखापालांना पोलीस कोठडी

पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी दोन्ही लेखापालांना पोलीस कोठडी

व्यभिचारी सूनेचा सर्पदंश करुन सासूने काढला काटा

सुमारे सव्वाचार हजार रुपयांच्या पीएमसी बँक कर्ज गैरघोटाळाप्रकरणी सोमवारी अटक करण्यात आलेल्या दोन्ही लेखापालांना मंगळवारी येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जयेश धीरजलाल संघाई आणि केतन प्रविणचंद्र लकावाला अशी या दोघांची नावे असून या दोघांना मंगळवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या दोघांच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता सात झाली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यात एचडीआयएलचे अध्यक्ष राकेशकुमार कुलदिपसिंग वाधवान, महाव्यवस्थापकीय संचालक सारंग राकेशकुमार वाधवान, बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, माजी संचालक वरियमसिंग कर्तारसिंग आणि सुरजीत सिंग अरोरा याच पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. पाचही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पीएमसी बँकेने 2008 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत एचडीआयएल कंपनीला कोट्यचधी रुपयांचे कर्ज वाटप केले होते.

भांडुपच्या पीएमसी बँकेतून या कर्जाचे वाटप केल्यानंतर या कंपनीसह त्यांच्या सलग्न कंपनीचे कर्जाची परतफेड झाली नव्हती. या बँकेतील ठराविक कंपन्यांची मोठी कर्ज खाती ज्यामध्ये कर्ज परतफेड होत नसल्याने अनुत्पादक कर्ज (एनपीए) झाली होती. असे असतानाही त्यांना अनुत्पादक कर्ज घोषित करण्यात आले नव्हते. तसेच ही माहिती जाणूनपूर्वक रिझर्व्ह बँकेपासून लपविण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात बँकेला 4 हजार 355 कोटी 46 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या गैरव्यवहार संबंधित कंपनीने बँकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुन केला होता, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत फसवणुकीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत 3 ऑक्टोंबर ते 16 ऑक्टोंबर या कालावधीत पाचही मुख्य आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते पाचही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या संपूर्ण प्रकरणात केतन आणि जयेश यांनी लेखापाल म्हणून काम पाहिले होते. त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची माहिती या दोघांना होती, मात्र त्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे त्यांना सोमवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते. सोमवारी त्यांची दिवसभर पोलिसांनी चौकशी केली होती. या चौकशीनंतर रात्री या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

First Published on: November 13, 2019 1:08 AM
Exit mobile version