सर्पदंशाने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

सर्पदंशाने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मृत्यू

अंबरनाथ पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला विषारी सर्पाने दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. या घटनेमुळे पोलीस वसाहतीत शोकाकूल वातावरण आहे. रविकांत पितांबर निकुंभे (५३), असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे. उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात ते पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. दरम्यान येथील पोलीस वसाहतीमधील वाढलेल्या झाडांमुळे येथे सापांचा वावर आहे. या बाबतची तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

मृत पोलीस कर्मचारी रविकांत निकुंभे

सर्पदंशान मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

रविकांत निकुंभे हे अंबरनाथ पोलीस वसाहतीमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते. भिवंडीतून निजामपुरा येथून निकुंभे यांची बदली होऊन ते १५ दिवसांपूर्वी हिललाईन पोलीस ठाण्यात हजर झाले होते. गुरूवारी हिललाईन पोलीस ठाण्यात रात्रपाळी करून ते शुक्रवारी सकाळी घरी गेले होते. सकाळी ११च्या सुमारास जेवण करून ते पुन्हा रात्रपाळीला जायचे असल्याने झोपले होते. सायंकाळी त्यांचा मुलगा सागर त्यांना उठवत असता निकुंभे हे कोणतीच हालचाल करत नव्हते. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. या शिवाय त्यांच्या पायावर सर्पाने दंश केलेल्या खुणा दिसत होत्या. मुलांनी त्यांना त्वरित जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. पण डॉक्टरांनी निकुंभे यांना विषारी सापाने दंश केल्याने त्वरीत मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यास सांगितले. निकुंभे यांना मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासण्यापूर्वीच मृत घोषित केले. त्यांना विषारी सर्पाने दंश केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण वैद्यकीय अहवालावरून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक करे करीत आहेत.

हेही वाचा – पनवेल महापालिका क्षेत्रावर आता सीसीटीव्हीची नजर

पोलीस वसाहतीत सापांचा वावर

पोलीस हवालदार निकुंभे यांच्या मृत्यूमुळे पोलीस वर्तुळामध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. निकुंभे कुटूंब हे ज्या अंबरनाथ पोलीस वसाहतीमध्ये राहतात त्या परिसरात झाडे-झुडपे आहेत. त्यामुळे तेथे मोठ्या संख्येत साप आढळल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. त्या परिसरात साफसफाई करण्यात यावी. नागरिकांनी याबाबतच्या तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या होत्या. पण तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने निकुंभे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला असल्याचा आरोप केला जात आहे. त्या परिसरात मोठ्या प्रमाणात सर्पांचा वावर असल्याने पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

First Published on: August 25, 2019 7:08 PM
Exit mobile version