गरोदर महिलेचे प्राण महिला पोलिसाने वाचवले

गरोदर महिलेचे प्राण महिला पोलिसाने वाचवले

Preganant women

धावत्या लोकलमधून पडलेल्या 4 महिन्यांच्या गरोदर महिलेचे पोलीस शिपाई रूपाली मेजारी यांनी प्राण वाचवले. ही घटना वांद्रे स्थानकात घडली होती. गरोदर महिला सध्या वांद्र्यातील भाभा रुग्णालयात दाखल असून महिला आणि तिचे अर्भक सुखरूप आहे. रूपाली मेजारी यांच्या धडाकेबाज कामगिरीबद्दल गरोदर महिलेच्या पतीने त्यांचे आभार मानले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालासाहेब शेटे यांनी कौतुक करून रूपाली मेजारी यांचा गौरव केला आहे.

जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई रूपाली मेजारी या पश्चिम प्रादेशिक विभाग येथील कार्यालयात मीटिंगसाठी जात होत्या. जलद लोकलच्या महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करणार्‍या पोलीस शिपाई रूपाली मेजारी या वांद्रे स्थानकात उतरण्यासाठी दरवाजापाशी येऊन उभ्या राहिल्या. स्थानक येण्यापूर्वी मोटारच्या जवळील महिलांच्या राखीव डब्याच्या दरवाजात उभी असलेली महिला चक्कर आल्याने धावत्या लोकलमधून पडल्याचे पोलीस शिपाई रूपाली मेजारी यांनी पाहिले.

वांद्रे स्थानकात लोकल थांबताच मेजारी या रेल्वे रुळावरून धावत जखमी महिलेजवळ गेल्या. त्या महिलेला स्थानकात आणून तत्काळ भाभा रुग्णालयात नेले. गंभीर जखमी महिलेच्या मोबाईलवरून तिच्या पतीशी संपर्क साधला असता तिचे नाव पूजा स्वप्निल जगताप (वय 23) असून ती 4 महिन्यांची गरोदर असल्याचे समजले.वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने पूजा आणि तिचे अर्भक वाचले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

First Published on: September 29, 2018 12:40 AM
Exit mobile version